
Mumbai Crime : कामावर जाऊ नको सांगूनही पत्नी कामावर निघाली; माथेफिरू पतीने भर रस्त्यातच...
डोंबिवली - पत्नीला नोकरी करण्यास नकार दिला, तरीही पत्नी कामावर जाण्यास निघाल्याने संतापलेल्या पतीने भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण परिसरात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंजीता शेट्टी हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपी पती शशिकांत शेट्टी हा हल्ल्यानंतर फरार झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शशिकांत याचा शोध घेत आहेत.
कल्याण जवळील शहाड परिसरातील एका सोसायटीमध्ये शशिकांत शेट्टी व रंजिता शेट्टी हे राहतात. या दोघांची तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे. रंजिता ही मुंबईतील विद्याविहार येथील एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. रंजिताच्या नोकरी करण्यास शशिकांत याचा विरोध होता. लग्न झाल्यापासून रंजिताच्या नोकरीवरुन दोघा पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. शुक्रवारी सकाळी देखील दोघांमध्ये या कारणावरुन वाद झाला.
शशिकांतने रंजिताला कामावर जाऊ नको सांगत वाद घातला. त्याचे न ऐकता रंजिता कामावर जाण्यास घराबाहेर पडली. यावेळी संतापलेल्या पतीने तिचा पाठलाग करत शहाड परिसरातच तिला गाठले. भर रस्त्यात त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. गंभीर जखमी रंजिताला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर शशिकांत याचा पोलिस शोध घेत आहेत.