
Mumbai News : धक्कादायक ! जगण्याचा कंटाळा आला म्हणून तरुणाने केली आत्महत्या
डोंबिवली - कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकला लटकत एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. विठ्ठल मिसाळ (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून आंबिवली येथे तो रहात होता.
जगण्याचा कंटाळा आला आहे असे बहीण व भाऊजीला फोन द्वारे सांगत विठ्ठल याने कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर आत्महत्या केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल याचा मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला असून याचा अधिक तपास केला जात आहे.
मूळचा बीड येथील रहिवासी असलेला विठ्ठल हा आंबिवली येथे बहीण व भाऊजी यांच्यासोबत रहात होता. विठ्ठल याने मंगळवारी पहाटे भाऊजी जालिंदर चौरे यांना 'मला जगण्याचा कंटाळा आला आहे, मी आत्महत्या करत आहे' असे कॉल करून सांगितले.
तसेच जालिंदर यांची पत्नी प्रिया हिला देखील व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. प्रिया यांनी तात्काळ त्यांचा भाऊ विठ्ठल हा कल्याण स्टेशन येथे आत्महत्या करत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत विठ्ठल याने गळफास घेतला होता. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने विठ्ठल याला खाली उतरविण्यात आले. त्याला उपचारासाठी रुक्मिणी बाई रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. जालिंदर यांच्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.