Mumbai : गोवंडीत गोवरचा डी ८ व्हेरीएंट आढळला, मुंबईत गोवरचा पिक पिरियड येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

measles

Mumbai : गोवंडीत गोवरचा डी ८ व्हेरीएंट आढळला, मुंबईत गोवरचा पिक पिरियड येणार

मुंबई : गोवंडीत गोवरच्या रूग्णांसोबतच रूबेलाच्या रूग्णांची संख्या आढळून आली आहे. गोवंडातील रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवरचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गोवरचा पिक पिरियड नजीकच्या काळात कधी येतो याचा ट्रॕक ठेवावा लागेल. त्यासाठी रूग्ण संख्येचा आलेख हा पीक पिरियड ठरवण्यासाठी सोयीचा ठरणर आहे. गोवंडीच्या गोवरच्या उद्रेकानंतर मुंबईत इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ मुजीब सय्यद यांनी सांगितले. गोवंडी एम पूर्व विभागात मौलानांना त्यांनी गोवर, रूबेलाच्या लसीकरणासाठी आवाहन करत नमाजच्या दिवशी हा संदेश पोहचण्यासाठी मदत करावी असेही सांगितले.

गोवंडी परिसरात कमी प्रमाणात झालेले लसीकरण तसेच लसीकरणाच्या बाबतीत झालेले दुर्लक्ष पाहता याठिकाणी गोवरच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मौलवींनी शुक्रवारी नमाजच्या दिवशी आवाहन करत लसीकरण तसेच गोवरच्या आजारावर उपचारासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले. या सगळ्या प्रक्रियेत समाजाला वेळीच रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टींची काय गरज आहे हेदेखील सर्वसामान्यांना पटवून द्यावे अशी विनंती त्यांनी केली.

गोवरचा डी ८ व्हेरीएंट

मुंबईत गोवंडीत आढळलेला गोवरचा विषाणू हा डी ८ टाईपचा आहे. याआधी २०१९ मध्ये हाच व्हेरीएंट आढळून आला होता. त्यामुळे गोवर, रूबेलाच्या रूग्णांचे घसा, लघवी, थुंकीचे नमुने हे पुण्यातील प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्स तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गोवरचा पीक गाठल्यानंतर समाजात नैसर्गिक इम्युनिटी तयार होईल. परंतु त्यासोबतच लसीकरणालाही अधिक प्रमाणात प्राधान्य देण्याचे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

युपी, बिहार राज्यातील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक गोवंडी परिसरात वास्तव्यास आहेत. अनेकदा कमी शिक्षण, लसीकरणाबाबतची माहिती नसणे, अनेक कारणामुळे लसीकरण रखडले जाणे यासारख्या अनेक कारणांमुळे गोवरचे रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७ रूग्णांनी लस न घेतल्याचा ट्रेंड दिसून आला आहे.