डबेवाल्यांच्या मदतफेरीला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

"एक हात मदतीचा... एक हात कर्तव्याचा' म्हणत नागरिकांनी सढळ हाताने वस्तुरूपात मदत दिली. पूरग्रस्त भागांत मदत पोहोचवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

मुंबई: पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरांतून मदत केली जात आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी "नूतन मुंबई टिफिन बॉक्‍स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट'च्या माध्यमातून अंधेरी, लोअर परळ, चर्चगेट, वांद्रे या ठिकाणी मदतफेरी काढली. "एक हात मदतीचा... एक हात कर्तव्याचा' म्हणत नागरिकांनी सढळ हाताने वस्तुरूपात मदत दिली.

पूरग्रस्त भागांत मदत पोहोचवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डबेवाल्यांनी मंगळवारी रेल्वेस्थानकांबाहेर मदतफेरी काढली. वेगवेगळ्या स्थानकांच्या परिसरांत 15 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबवला जाईल. नागरिकांकडून मिळालेली मदत 17 ऑगस्टला सांगली, कोल्हापूरला पाठवली जाईल, असे नूतन मुंबई टिफिन बॉक्‍स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.

देशात कुठेही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तरी मुंबईकर मदतीसाठी पुढाकार घेतात, हे आजही आम्हाला मदतफेरी काढल्यानंतर दिसले, असे ते म्हणाले. या कार्यात हातभार लावून सामाजिक बांधिलकी व एकीचे दर्शन घडवणाऱ्या सर्व नागरिकांचे मी आभार मानतो, अशी भावना मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MUMBAI DABEWALE HELPING FOR KOLHAPUR FLOOD