मंगळवारपासून मुंबई अंधारात? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल 561.58 कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. 21) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे.

मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल 561.58 कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. 21) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे मंगळवार मध्यरात्रीपासून शहरातील काही भाग अंधारात बुडण्याची भीती आहे. 

शहरात बेस्ट उपक्रमामार्फत वीजपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करण्यात येते. वीज खरेदीबाबत टाटा आणि बेस्टमध्ये करार झाला आहे. बेस्ट उपक्रमाने डिसेंबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत केलेल्या वीज खरेदीचे पैसे टाटा वीज कंपनीला दिलेले नाहीत. ही रक्‍कम तब्बल 561 कोटी 58 लाख रुपये आहे. थकबाकीची रक्कम वाढत चालल्यामुळे टाटा वीज कंपनीने बेस्ट उपक्रमाला नोटीस बजावत पैसे तातडीने देण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट उपक्रमाकडून वेळेत पैसे देण्यात येत नसल्याने टाटा कंपनीने 21 मे रोजी मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमाला विजेची विक्री करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीस टाटा वीज कंपनी जबाबदार नसेल, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai in the dark From Tuesday