Mumbai : प्रवाशाने सुखरुप मुलाला केले पालकांच्या हवाली

दिवा कोपर रेल्वे स्थानका दरम्यानची घटना
passenger
passenger sakal

डोंबिवली : दिवा स्थानकातून रोहा येथे जाण्यासाठी माय लेकर चुकून वसई गाडीत चढली. दिव्याजवळच सिग्नलला गाडी थांबल्याने आईने तेथेच उतरण्याचा निर्णय घेतला. एका प्रवाशाला तिने मुलाला गाडीतून खाली उतरविण्याची विनंती केली. यावेळी तो प्रवासी 3 वर्षीय मुलाला घेऊन खाली उतरला आणि गाडी सुरु झाल्याने आई मात्र गाडीतच राहीली. आई आणि मुलाची ताटातूट झाली, आपला मुलगा आता पुन्हा आपल्याला भेटेल का या आशेने कासावीस झालेला आईचा जीव अवघ्या तासाभरातच भांड्यात पडला. त्या प्रवाशाने कोपर स्टेशन मास्तरांना याची माहिती दिल्याने अवघ्या तासाभरात आई व मुलाची पुन्हा भेट झाली. प्रवाशाने सुखरूप आईच्या हवाली मुलाला केल्याने त्याचे रेल्वे प्रशासन व पालकांनी आभार मानले.

डोंबिवली जवळील कोपर परिसरात हर्षल धनराळे त्यांच्या पत्नी अंजू व 3 वर्षीय मुलगा यज्ञेश राहातो. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास अंजू या माहेरी रोहा येथे जाण्यासाठी निघाल्या. दिवा स्थानकातून त्यांना दिवा रोहा गाडी पकडायची होती. मात्र त्या चुकून दिवा वसई गाडीत चढल्या. आपण चुकीच्या गाडीत चढलो असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अप्पर कोपर स्थानकात उतरण्याचा निर्णय घेतला.

सदर लोकल ही दिवा ते अप्पर कोपर स्थानका दरम्यान असलेल्या सिग्नलला थांबली. यावेळी अंजू यांनी गाडीतील प्रवासी प्रणितला आपल्या मुलाला खाली उतरवण्यास मदत करण्यास सांगितले. प्रणित यज्ञेशला घेऊन खाली उतरताच गाडी सुरु झाल्याने अंजू यांना गाडीतून उतरता आले नाही. आपला मुलगा अज्ञात व्यक्तीच्या हाती असल्याने आईचा जीव कासाविस झाला. तीने ताबडतोब घरी सासू, पतीला फोन करुन याची माहिती दिली. अप्पर कोपर स्थानकात अंजू उतरली आणि प्रवासी दिवा स्थानकात जाईल या विचाराने तीने कोपर येथून लोकल पकडून दिवा स्थानक गाठले. तोपर्यंत सहप्रवाशांनी रेल्वे पोलिसांना देखील याची माहिती दिली होती.

दरम्यान तोपर्यंत प्रणित हा मुलाला घेऊन रेल्वे रुळातून चालत कोपर रेल्वे स्टेशनला पोहोचला. त्याने रेल्वे पोलिसांच्या मदतीने स्टेशन मास्तरांकडे धाव घेत घडलेली घटना सांगितली. तोपर्यंत रेल्वे पोलिस, आरपीएफच्या जवानांनी दिवा, कोपर, भिंवडी स्थानकात संपर्क साधून कोणाचे मुल हरविले असल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा अशी घोषणा करण्यास सुरुवात केली होती. अंजू यांच्या कानी ती घोषणा पडताच त्यांनी दिवा स्टेशन मास्तर कार्यालयात संपर्क साधत हकीकत सांगितली. त्यानंतर कोपर रेल्वे स्थानक अंजू व तिचे कुटूंब दाखल झाले. रेल्वे पोलिसांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करत, तपासणी करत मुलाला आई वडीलांच्या स्वाधीन केले. आपला मुलगा सुखरुप असल्याचे लक्षात येताच आईने त्याला मिठीत घेत प्रणितचे आभार मानले.

रोहा येथे जायचे असल्याने दिवा स्थानकातून महिला प्रवाशाने गाडी पकडली, परंतू आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्याने मध्येच गाडी थांबल्याने तेथेच उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी आईने एका प्रवाशाची मदत मागितली. तो मुलाला घेऊन खाली उतरला परंतू आईला उतरता आले नाही. माय लेकरांची ताटातूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यासंबंधी आम्ही दिवा, कोपर, भिवंडी स्थानकात तशा घोषणा करत शोध सुरु केला. तोपर्यंत प्रणित हा मुलाला घेऊन ट्रॅक वरुन चालत आला होता. महिला कॉन्स्टेबल मीना व टिसी यांना त्याने सदर माहिती दिली. त्यांनी कंट्रोल, स्टेशन मास्तर यांना माहिती देत पालकांचा शोध घेतला. सदर मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

भूषण घाणे, कोपर स्टेशन मास्तर

गाडी सिग्नलला थांबल्याने सदर महिला प्रवाशाने मला तिच्यासोबत असलेल्या मुलाला खाली उतरविण्यासाठी मदत मागितली. मी मुलाला घेऊन खाली उतरलो आणि गाडी सुरु झाल्याने सदर प्रवासी महिलेला खाली उतरता आले नाही.

मला कोठे जावे हे न सुचल्याने दिवा सिग्नलपासून सुमारे पाऊण तास चालत मी कोपर स्थानकात आलो. कोपर स्टेशन मास्तरांना घटना सांगितली. त्यांनी यंत्रणा हलवित पालकांचा शोध घेतला त्यानंतर मुलाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. तो मुलगा माझ्याजवळ असल्याने त्याची जबाबदारी माझी होती, ती पार पाडल्याचे समाधान आहे.

प्रणित जंगम, सह प्रवासी

माहेरी रोहा येथे जाण्यासाठी मी गाडी पकडली, परंतू ती चुकीची असल्याचे लक्षात आले. सिग्नलला गाडी थांबल्याने तेथेच उतरुन पुन्हा पाठी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी गाडीतील एका दादाला मी मुलाला खाली उतरविण्यासाठी मदत कर सांगितले. तो मुलाला घेऊन उतरला आणि गाडी सुरु झाली व मी गाडीतच राहीले.

याची माहिती मी घरी फोन करुन सांगितली. त्यांनी तत्काळ कोपर स्थानक गाठत पोलिसांना ही माहिती दिली. मी सुद्धा कोपर स्थानकातून पुन्हा दिवा स्थानक गाठले. त्यानंतर कोपर स्थानकात आमचा मुलगा असल्याचे समजल्यावर येथे येत आम्ही त्याला घेतले. प्रणित यांनी माझ्या मुलाची काळजी घेत त्याला सुखरुप आमच्या हवाली परत केल्याने त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत.

अंजू धनराळे, महिला प्रवासी (बाळाची आई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com