
Mumbai : चित्रकाराच्या रेखाटनामुळे ४५० गुन्हेगारांना बेड्या!
बूरमधील एका शाळेत नितीन यादव चित्रकलेचे शिक्षक आहेत. आरोपीच्या वर्णनावरून त्याचे स्केच काढून देण्यात ते पोलिसांना मदत करतात. विशेष म्हणजे, स्केचसाठी ते कोणतेही शुल्क आकारत नाहीत. स्केचिंग एक सामाजिक सेवा असल्याचे ते सांगतात. पोलिसांसाठी यादव यांनी आतापर्यंत चार हजारहून अधिक रेखाचित्रे काढली आहेत.
नितीन यादव यांचा जन्म मुंबईत अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील कुर्ल्यातील एका मिलमध्ये कामाला होते. आई-वडील, तीन भाऊ आणि तीन बहिणी असा त्यांचा परिवार. त्यांनी आणि त्यांच्या मोठ्या बहिणीने चित्रकला हे व्यवसायाचे माध्यम म्हणून स्वीकारले. उदरनिर्वाहासाठी दोघेही शाळेत चित्रकला शिक्षक बनले. आज तीन दशके यादव चेंबूरमधील प्राथमिक शाळेत चित्रकला शिकवत आहेत.
१९८४ मध्ये कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये खून झाला होता. त्या वेळी यादव पोलिसांच्या वाहनांच्या नंबरप्लेटचे काम करत असत. खून प्रकरणातील आरोपीला कसे पकडायचे, याची योजना पोलिस आखत होते. हॉटेलमधील एका वेटरने आरोपीला पाहिले होते.
तेव्हा यादव यांनी वेटरकडून माहिती घेऊन आरोपीच्या चेहऱ्याचे स्केच बनवण्याचा प्रस्ताव पोलिसांना दिला. पोलिसांनीही तो मान्य केला. वेटरने त्यांना कित्येक तास आरोपीचे वर्णन सांगितले. त्यानुसार यादव यांनी चित्र काढले.
आरोपीच्या चेहऱ्याशी ते ८० टक्के मिळतेजुळते होते. त्या स्केचच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीला पकडले. पोलिसांना मिळालेल्या यशानंतर यादव यांची प्रशंसा झाली. त्यानंतर अनेकदा पोलिसांनी त्यांच्याकडून आरोपीचे स्केच काढून घेतले. त्यांच्या कामाचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे.
जटील प्रकरणे सोडवण्यात यश
वांद्र्यात एका महिलेची हत्या झाली होती. चौकीदाराने खुन्याला पाहिले होते. नितीन यादव यांनी बनवलेल्या स्केचच्या आधारे आरोपी पकडला गेला. चार वर्षांपूर्वी वडाळ्यातील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. तेव्हाही यादव यांनी रेखाटलेल्या स्केचमुळे आरोपीला अटक झाली. चेंबूरमधील एका महिलेच्या हत्येप्रकरणीही यादव यांनी आरोपीचे स्केच काढले होते.
‘हाफ पोलिस’ ओळख
आपल्या अनोख्या देशसेवेमुळे नितीन यादव ‘हाफ पोलिस’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत १५० हून अधिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. गेली २८ वर्षे ते पोलिसांना आरोपींचे स्केच बनवून देत आहेत; परंतु आजपर्यंत त्यांनी त्यासाठी एक रुपयाही घेतलेला नाही.
चार हजारांहून अधिक स्केच
नितीन यादव यांनी पोलिस तपासासाठी स्केच काढायला सुरुवात केली त्या काळात सोशल मीडिया नव्हता. पोलिस दलात यादव यांची चर्चा सुरू झाली आणि हळूहळू मुंबईच्या सर्व चौक्यांत त्यांचे नाव पोहोचले. लहानापासून मोठ्या प्रकरणापर्यंत स्केच बनवण्यासाठी पोलिस त्यांना बोलवू लागले. यादव यांनी आतापर्यंत पोलिसांसाठी चार हजारांहून अधिक चित्रे रेखाटली आहेत.