
Mumbai : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरणात चार आरोपी अटकेत
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे मुंबई जिल्हाध्यक्ष परमेश्वर रणसूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ या दोन पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री चार मारेकऱ्याना अटक केली आहे. या प्रकरणी राजेश हातणकर नजीर सय्यद, साकिब कुरेशी आणि कृष्णा यादव याना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी राजेश हातणकर हा एकेकाळी गँगस्टर अबू सालेम टोळीचा शुटर म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पनवेलमधील बड्या राजकारणाचा मुलगा असून त्याने हल्ला करण्यासाठी आरोपींना 5 लाखांची सुपारी दिल्याची माहिती मिळत आहे.
तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलीसांकडून मिळते. या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
अटक आरोपी राजेश हातणकर याच्यावर हत्येचे 7 गुन्हे दाखल असून यातील 5 प्रकरणांत पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला आहे. न्यायालयात त्याच्यावर 2 खटले सुरु असल्याची माहिती मिळत आहे. कांदिवलीतील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी हातणकर हा 2016 पासून तुरुंगात होता. 2022 मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. मुंबईतील दादर परिसरात 27मे रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी परमेश्वर रणसूर आणि गौतम हराळ यांच्यावर चाकू आणि रॉडने हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात परमेश्वर आणि गौतम हराळ हे जखमी झाले होते, त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध पुढील तपास सुरू केला होता. .अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांपैकी दोघे जण सराईत गुंड असून त्याच्यावर मुंबईत गुन्हे दाखल असल्याचे समजते.