
विदर्भाच्या कबड्डी संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईतील एका कबड्डीपटूची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
Mumbai Fraud : संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईच्या कबड्डीपटूची फसवणूक
मुंबई - विदर्भाच्या कबड्डी संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईतील एका कबड्डीपटूची 1.70 लाखांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमरावतीच्या शहर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्रसिंग प्राणसिंग ठाकूर व भूपेद्रसिंग प्राणसिंग ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. तसेच स्वागत आनंद शिंदे या मुंबईतील कबड्डीपटूची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप आहे.
जानेवारी 2022 मध्ये स्वागत शिंदे मुंबईत कबड्डीचा सराव करीत असताना त्याच्या प्रशिक्षकाने जितेंद्र उर्फ जितू ठाकूर याची विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव या नात्याने ओळख करून दिली. त्यावेळी जितू ठाकूरने स्वागत शिंदे याच्या खेळाचे कौतुक करून त्याला विदर्भस्तरीय कबड्डी संघात निवड करण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी स्वागत शिंदेशी गोड बोलून आमिष दाखवून याचा विश्वास संपादन केला. तुझे कबड्डी खेळण्याचे कौशल्य चांगले आहे. तू विदर्भाचा नसूनही तुझी विदर्भ कबड्डी संघात निवड करून देतो. त्यासाठी मात्र 2 लाख रुपये द्यावे लागतील, तुला राष्ट्रीय स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळेल, असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर स्वागतने आपले वडील दोन लाख रुपये देण्यास तयार नाहीत, ते दीड लाख रुपये देऊ शकतात, असे आरोपींना सांगितले. आरोपीने बँकेच्या खात्यावर दीड लाख रुपये पाठविण्यास सांगितले.
17 मार्च 2022 रोजी स्वागतच्या वडिलांनी ही रक्कम आरोपीच्या बँक खात्यात वळती केली. पण, काही दिवसांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड समिती दीड लाख रुपयांमध्ये निवड करण्यास तयार नाही, आणखी पैसे हवेत, असे आरोपींनी सांगितल्यावर स्वागतच्या वडिलांनी पुन्हा 20 हजार रुपये पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपींनी स्वागतला अयोध्या येथे आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवले. तेथे त्याला आपल्या नावाची नोंदणीच झाली नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर स्वागतने आरोपींकडे पैसे परत मागितले. पण, ते देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. अखेरीस स्वागत याने तक्रार दाखल केली.