महाडमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग तीन तास बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुंबई-गोवा महामार्गावर नडगावच्या हद्दीत  दरड कोसळल्याने महामार्गाची वाहतूक तीन तीस ठप्प

महाडः मुसळधार पावसाने महाड तालुक्‍याला चांगलेच झोडपल्याने सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली.यामुळे महाड शहराला पुराचा तडाखा बसला; तर मुंबई-गोवा महामार्गावर नडगावच्या हद्दीत पहाटे तीनच्या सुमारास दरड कोसळल्याने महामार्गाची वाहतूक तीन तीस ठप्प झाली होती. 

नडगाव गावच्या हद्दीत महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदलेल्या डोंगरातून पहाटे महामार्गावर दरड कोसळली. चिखलाचा मलबा रस्त्यावर आल्याने वाहतूक पहाटे तीनपासुन बंद झाली होती. सहापर्यंत ही दरड काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. 

मुसळधार पावसाने शहरातील मासळी बाजार, दस्तुरी नाका, भीमनगर, अर्जुन भोई मार्ग; तर बाजारपेठेत भगवानदास बेकरीपर्यंत पुराचे पाणी आले. दुपारी ओहोटीमुळे पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली. 

तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. दूरध्वनी यंत्रणा तसेच वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. दस्तुरी नाका महाड ते रायगड हा मार्ग ही पुराच्या पाण्याने बंद झाला होता. 

महाड पुणे मार्ग सुरू राहिल्याने दूध आणि भाज्यांच्या गाड्या मात्र शहरात आल्या. महाड आगारातून सुटणाऱ्या मुंबईकडील सर्व गाड्या या पनवेलपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मुंबईमध्ये पाणी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आगारप्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai goa highway close due to land slide