मुंबई-गाेवा महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे एसटीला फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई-गाेवा महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे एसटी बसगाड्या वारंवार नादुरुस्त होत आहेत.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांसह मुंबई-गाेवा महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे एसटी बसगाड्या वारंवार नादुरुस्त होत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी बसगाड्यांना नेहमीच उशीर होतो. त्यामुळे अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

रायगड जिल्ह्यातून दररोज पुण्याकडे ५० आणि मुंबईकडे १०० बसगाड्या ये-जा करतात. खराब रस्ते व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने या सर्व बसगाड्यांना तब्बल दोन तास उशीर होत आहे. स्थानिक बसगाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर खडी, दगड आणि चिखल पसरला आहे.या परिस्थितीमुळे वडखळ ते रामवाडी व खारपाडा हे अनुक्रमे ७ आणि १५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक तास ते दीड तास लागतो. 

मुंबईपासून पोलादपूर आणि महाड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, सुधागड, पेण, अलिबाग या तालुक्‍यांतील गावांत जायचे असल्यास हाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्यामुळे एसटी आणि खासगी वाहतुकीला फटका बसला आहे. 

सतत बिघाड
खराब रस्ते व खड्ड्यांत आदळल्यामुळे टायरचे नुकसान होते, बांधणी खिळखिळी होते, स्प्रिंग तुटतात, बसगाड्यांचे आयुष्य कमी होते. बसगाड्यांची सतत दुरुस्ती आणि सुटे भाग बदलावे लागत असल्यामुळे महामंडळाला फटका बसतो.

खराब रस्त्यांमुळे एसटी बसगाड्या सरासरी दोन तास उशिराने येत आहेत. बसगाड्यांचे नुकसान होत असून, पुरेसे प्रवासीही मिळत नाहीत. गणेशोत्सवात या भागातून दोन दिवसांत २५०० बसगाड्या कशा जातील, हा प्रश्‍न पडला आहे. 
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पेण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Goa Highway not in well condition it's affected on ST