मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोद नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील माणगावनजीक असलेला गोद नदीवरील कळमजे येथील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने धोकादायक बनला आहे.

माणगाव: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील माणगावनजीक असलेला गोद नदीवरील कळमजे येथील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने धोकादायक बनला आहे.

महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्याचाही भार वाढल्याने पूल कमकुवत बनला आहे. शंभर वर्षे जुन्या पुलावर झाडीझुडपे वाढली असून, त्याची मुळे आत जाऊन काही ठिकाणी दगड फुटले आहेत. पुलाचा जुन्या दगडांनी बांधकाम केले आहे. त्याची डागडुजी अद्याप केलेली नाही. वाहतुकीसाठी पूल धोकादायक झाला असून, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नदी पुलाच्या बाजूने मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वे रुंदीकरणाचे काम चालू असून, मातीचा भराव केल्याने अतिवृष्टी झाल्याने नदी पुलाखाली जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे धोका जाणवू लागला आहे. भविष्यात महाडमधील सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गोद नदीचे पाणी पूर्णपणे या पुलावर आडले जात आहे. पुलाच्या स्प्रिंगिंग लर्डच्या वर पाण्याची पातळी गेली तर सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक थांबविण्यात येईल.
- पी. पी. गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग, उपअभियंता, महाड

ब्रिटिशकालीन पूल भविष्यात धोकादायक होण्याआधीच संबंधित अधिकारी व प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी.
- सुरेश खाडे, ग्रामस्थ, कळमजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai goa national highway god river bridge in danger