Gudi padwa : गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकणार कारसाठी प्रतीक्षा यादी आठ लाखांवर Mumbai Gudi padwa Car manufacturers dealers hit hard | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car

Gudi padwa : गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकणार कारसाठी प्रतीक्षा यादी आठ लाखांवर

मुंबई : सेमीकंडक्टरचा तुटवडा कमी होऊनही सर्वाधिक खपाच्या वाहनांसाठी वाट पाहण्याचा कालावधी कमी होण्याची चिन्हे नाहीत. देशभरातील ग्राहकांनी नोंदणी केलेल्या विविध कंपन्यांच्या तब्बल आठ लाख कार ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला घरी कार येईल की नाही, याची धास्ती ग्राहकांना लागली आहे.

फेब्रुवारी महिन्यात प्रतीक्षा यादी असलेल्या वाहनांची संख्या सात लाख ६० हजारांवर होती. त्यामुळे २०२३ मध्ये मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोविड काळात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कार उत्पादक आणि डीलर्सना मोठा फटका बसला होता.

आता सेमीकंडक्टरचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे; मात्र तरीही सर्वाधिक लोकप्रिय कार ग्राहकांना मिळण्याचा वेळ वाढला आहे. कार उत्पादक कंपन्यांकडून वाहन उपलब्ध करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक नोंदणी घेत असल्याने ही समस्या उद्‍भवत असल्याचे जाणकाराने सांगितले.

किंमत जाहीर होण्यापूर्वी नोंदणी

आमच्याकडे नव्या कारसाठी चौकशी आणि नोंदणी करण्याची संख्या वाढली आहे. अजूनपर्यंत बाजारात न उतरवलेल्या मारुतीच्या जिमनी आणि फ्रॉक्स या मॉडेलसाठी प्रत्येकी २२ हजार, १२ हजार एवढी नोंदणी झाली आहे. या दोन मॉडेलच्या किमतीही अजूनपर्यंत आम्ही जाहीर केल्या नाहीत, असे मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग सेल्सचे प्रमुख शंशाक श्रीवास्तव यांनी सांगितले.

सर्वाधिक मागणी कुणाला?

मारुतीने ‘ग्रँड विटारा एसयूव्ही’हे मॉडेल सप्टेंबर २०२२ मध्ये बाजारात आणले. या वाहनासाठी जवळपास ३७,५०० ऑर्डर पेंडिंग आहेत. जून २०२२ मध्ये बाजारात आलेली ‘न्यू ब्रिझा एसयूव्ही’ या मॉडेलसाठी ६३ हजार ग्राहक प्रतीक्षेत आहेत.

मारुतीच्या ‘इर्टिगा’ या मॉडेलची डिलिव्हरी मिळण्यासाठी ९६ हजार ग्राहक ताटकळत बसले आहेत. ‘इर्टिगा’ हे मॉडेल सीएनजीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे इर्टिगाला कायमस्वरूपी मागणी असल्याचे वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

ई-वाहनांसाठी सहा महिने थांबा

गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला पाच हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होत आहे. या वाहनांसाठीची प्रतीक्षा यादी मोठी आहे. देशातील सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक कार ‘टाटा नेक्सॉन ईव्ही’ ही आहे.

या कारसाठी ग्राहकांना सरासरी ५ ते ६ महिने वाट पाहावी लागते. दर महिन्याला टाटा नेक्सॉनच्या तीन हजार गाड्या विकल्या जातात. प्रतीक्षा यादी १५ हजार आहे. टाटा मोटर्सच्या ‘टियागो ईव्ही’ मॉडेलसाठी प्रतीक्षा कालावधी ३ ते ४ महिने एवढा आहे, असे टाटा प्रवासी वाहनाचे संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले.