Mumbai Rain:आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, मुंबई पालिकेकडून नागरिकांना आवाहन

पूजा विचारे
Wednesday, 23 September 2020

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. 

मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 

भारतीय हवामान खात्यानं आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. 

तसंच नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले  आहे. 

बंगालच्या उपसागारात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकीवरही परिणाम झाला होता. मंगळवार सकाळपासून बुधवार सकाळपर्यंत शहर विभागात 267.62, पूर्व उपनगरात 173.22 आणि पश्चिम उपनगरात 251.48 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
 
सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.

चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत.

Mumbai Heavy Rainfall Municipal Corporation appealed citizens


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Heavy Rainfall Municipal Corporation appealed citizens