"व्हॉटसऍपवरील दोन व्यक्तीतील संभाषण सार्वजनिक असू शकत नाही"

"व्हॉटसऍपवरील दोन व्यक्तीतील संभाषण सार्वजनिक असू शकत नाही"

मुंबई - व्हॉटसऍपवर दोन व्यक्तींनी एकमेकांशी केलेले संभाषण हे काही सार्वजनिक स्वरूपाचे नसते, त्यामुळे तेथे व्यक्त केलेल्या मतांमुळे एखाद्यावर सार्वजनिक ठिकाणी अपशब्द बोलल्याचा गुन्हा लागू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे; मात्र व्हॉटसऍप ग्रुपमध्ये जर असे संभाषण झाले असेल, तर गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे दाखल झालेल्या पती-पत्नीच्या वादासंदर्भात न्यायालयाने नुकतेच निकालपत्र जाहीर केले आहे. पतीने व्हॉटसऍपवरील मेसेजमध्ये मला असभ्य भाषेत अपशब्द वापरले आणि माझ्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचा आरोप करत एका 27 वर्षीय महिलेने पतीविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यासह अन्य कायद्यांनुसार फिर्याद नोंदवली आहे. ही फिर्याद रद्द करण्यासाठी पतीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सदर याचिकेवर न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. 

या जोडप्याचा विवाह सन 2017 मध्ये झाला आहे. दरम्यानच्या काळात पतीने मला व्हॉटसऍप मेसेज पाठवून त्यामध्ये मला वारांगना म्हणाला तसेच अनेक आक्षेपार्ह गोष्टीही बोलला, असा आरोप पत्नीच्या वतीने करण्यात आला; मात्र व्हॉटसऍप संभाषण केवळ त्या दोघांमध्येच झाले आणि त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अपशब्द वापरले नाहीत, असा बचाव पतीच्या वतीने करण्यात आला. याबाबत व्हॉटसऍपच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहितीही दाखल करण्यात आली. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य मानला. दोन व्यक्तींमधील संभाषण हे काही सार्वजनिक ठिकाणी केलेल्या गप्पा नसतात, त्यामुळे त्याची माहिती फक्त त्या दोघांनाच असते. जर अशी माहिती व्हॉटसऍप ग्रुपवर शेअर केली, तर सार्वजनिक ठिकाणी विधाने केली म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पतीविरोधात कलम 294 चा गुन्हा न्यायालयाने अमान्य केला. 

मानहानीचा गुन्हा कायम 
पती-पत्नीतील संभाषणात पत्नीला वारांगना म्हटल्या प्रकरणी पतीविरोधातील गुन्हा न्यायालयाने कायम ठेवला आहे. पत्नी किंवा कोणत्याही महिलेला अशाप्रकारे संबोधणे हे मानहानी करण्यासारखे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी भादंवि कलम 509 नुसार तपास करून निर्णय घ्यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. 

mumbai high court aurangabad bench on whatsapp communication between two people

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com