फटाक्‍यांच्या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

फटाक्‍यांशी संबंधित नियमांचे पालन विक्रेत्यांकडून झाले पाहिजे. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पथके तयार करून प्रभागांतील फटाक्‍यांच्या दुकानांची पाहणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

मुंबई : उत्सवांच्या जल्लोषात सुरक्षेचेही भान ठेवायला हवे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक महापालिकेच्या प्रभागांतील फटाक्‍यांच्या दुकानांमधील सुरक्षेची तपासणी करावी आणि बेकायदा थाटलेल्या दुकानांवर कारवाई करावी, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिले.

फटाक्‍यांशी संबंधित नियमांचे पालन विक्रेत्यांकडून झाले पाहिजे. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पथके तयार करून प्रभागांतील फटाक्‍यांच्या दुकानांची पाहणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. प्रभाग कार्यालयांनी ही तपासणी करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. नियमबाह्य पद्धतीने फटाके विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती सरकारच्या वतीने ऍड. अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली

 नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लसुरे यांनी ऍड्‌. अभय परब यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. फटाके विक्रेत्यांना परवाना देतानाही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होणे गरजेचे आहे; मात्र आता दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे फटाक्‍यांची दुकाने आणि गोदामांची पाहणी करून दुर्घटना घडणार नाही, अशी उपाययोजना करायला हवी. प्रशासनाने याबाबत तपासणी करून आवश्‍यकता वाटल्यास दंडही करावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

याचिकादाराच्या वतीने ऍड. ऋतुजा लोकरे, आशीष देशमुख, नीता फुलसुंगे यांनी काम पाहिले. याचिकादाराला धमक्‍या येत असल्याची माहितीही या वेळी न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे त्यांना पुरेसे पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

Web Title: Mumbai High Court orders BMC to keep check on Crackers shop