Plane : मुंबई- होचिमिन्ह विमानाला लेटमार्क! विमानतळावर १० तास अडकून पडले प्रवासी! mumbai hochiminh plane latemark Passengers were stuck at the airport for 10 hours | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Airport

Plane : मुंबई- होचिमिन्ह विमानाला लेटमार्क! विमानतळावर १० तास अडकून पडले प्रवासी!

मुंबई - व्हिएतनाममधील होचिमिन्ह सिटीला जाणाऱ्या व्हिएतजेटच्या विमानातील सुमारे ३०० प्रवासी विमानातील बिघाडामुळे मुंबईत विमानतळावर सुमारे १० तास अडकून पडले होते. बराच विलंब होऊनही विमान कंपनीने प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास व्हिएतनाम कंपनीचे विमान मिन्ट सिटीकरिता उड्डाण करणार होते. परंतु विमानाने वेळेत उड्डाण केलेच नाही. सुरुवातीला तांत्रिक समस्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु नंतर विमानाबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने ३०० प्रवाशांना रात्र विमानतळावरच काढावी लागली. त्यातच एअरलाइनकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या नसल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. विशेषता लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले.

डीजीसीएच्या नियमांनुसार, एखाद्या विमानाला निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्यास प्रवाशांना निवास आणि भोजनाची व्यवस्था संबंधित विमान कंपनीने केली पाहिजे. उड्डाणाबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने संपातलेल्या प्रवाशांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'व्हिएटजेट या कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी ट्विट केले.