मुंबईकरांचे मानसिक संतुलन ढासळतेय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत असून, आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधन अहवालामध्ये मनोरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याखालोखाल मधुमेह, हृदयविकार असणारे रुग्ण आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

मुंबई - बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत असून, आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधन अहवालामध्ये मनोरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याखालोखाल मधुमेह, हृदयविकार असणारे रुग्ण आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के रुग्ण हे मनोविकाराशी संबंधित, तर त्याखालोखाल सुमारे २३ टक्के रुग्ण हे रक्तदाब आणि मधुमेहाचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच महापालिकेच्या १५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि १७५ दवाखान्यांमध्ये जाणाऱ्या रुग्णांमध्ये जीवनशैलीशी निगडित आजारांचे मोठे प्रमाण आढळल्याची बाब या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. 

हा अभ्यास अहवाल महापालिका प्रशासनास सादर करण्याच्या निमित्ताने एक विशेष कार्यशाळा नुकतीच झाली. यात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, वैद्यकीय शिक्षण व रुग्णालयांचे संचालक आदी या वेळी उपस्थित होते. पालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयांचे प्रमुख, ५२ तज्ज्ञ डॉक्‍टरांनी तसेच कर्मचाऱ्यांनी सलग सात महिने या प्रकल्पावर काम केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली.

मधुमेह, हृदयविकाराचे रुग्णही वाढले
ऑक्‍टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान आलेल्या रुग्णांपैकी ७२ लाख ६१ हजार १३० रुग्णांशी संबंधित माहितीचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण करण्यात आले. याव्यतिरिक्त सात दिवस रुग्णालयात आणि दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन तसेच सात दिवसांत आलेले बाह्यरुग्ण किंवा आंतररुग्ण म्हणून दाखल झालेल्या एक लाख १३ हजार ४४२ रुग्णांच्या माहितीचाही अभ्यास करण्यात आला. यानुसार तब्बल ७३ लाख ७४ हजार ४७२ रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनास सादर करण्यात आला आहे. त्यात मनोविकार, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार तसेच रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार प्राणी दंश, हृदयविकार, डेंगू, दमा, अचानक ताप, अतिसार व मलेरिया या आजारांचा समावेश आहे.

सर्वेक्षणातील नोंद...
74 लाख रुग्णांची तपासणी
31 टक्के रुग्ण मनोविकाराचे
23 टक्के रुग्ण रक्तदाबाचे

Web Title: mumbai Human Mental balance down