प्रदूषणमुक्त भारतासाठी मुंबई ते कन्याकुमारी सायकलस्वारी

kANYAKUMARI CYCLE 1.jpg
kANYAKUMARI CYCLE 1.jpg

मुंबई : देशात वाढत जाणारी प्रदूषणाची समस्या, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विविध आजारांचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्या अनुषंगाने "प्रदूषणमुक्त भारता'चा संदेश देण्यासाठी मुंबई व पुण्यातील सात युवकांनी मुंबई ते कन्याकुमारी असा 1,700 कि.मी.चा प्रवास सायकलने नुकताच पूर्ण केला आहे. 

सतीश जाधव, सोपान नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दीपक निचित, लक्ष्मण जगताप आणि अभिजित गुंजाळ हे मुंबई व पुण्यातील सात युवक प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्याच्या हेतूने एकत्र आले. आतापर्यंत कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. या वर्षी निसर्गासोबत साजरी करायची, असा विचार करून सातही जणांनी मुंबई ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलने करण्याचा निर्णय घेतला. 

25 ऑक्‍टोबरला मुंबईतून सुरू केलेला प्रवास 4 नोव्हेंबरला कन्याकुमारी येथे पूर्ण झाला. दररोज साधारण 150 कि.मी.चा प्रवास करून 11 व्या दिवशी सातही जण कन्याकुमारीला दाखल झाले. वाटेत खंडाळा, कात्रज आणि खंबाटकी घाटासह दक्षिण भारतातील अनेक घाट लागणार होते. तरीसुद्धा मोठ्या जिद्दीने त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचे सतीश यांनी सांगितले. प्रवासात सायकल पंक्‍चर होणे, तार तुटणे, कडक ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे जोरदार वारे, अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस, हवामान खात्याने सूचित केलेले वादळ आणि महामार्गावर असलेली भरधाव वाहनांची वर्दळ अशा अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी आपली मोहीम पूर्ण केली. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, संकेश्‍वर, धारवाड, दावनगिरी, सिरा, बंगळूर, सेलेम, दिंडीगुल, कोवीलपट्टी आणि कन्याकुमारी अशा एकूण 1760 कि.मी.च्या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी, सरकारी अधिकारी, पोलिसांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सतीश जाधव यांनी सांगितले. 
--- 
11 दिवसांच्या या प्रवासात अनेक शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, पोलिस ठाण्यात जाऊन आम्ही "प्रदूषणमुक्त भारता'चा संदेश दिला. कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी प्रशांत वडनेरे यांनी आमच्या मोहिमेची दखल घेत प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला. 
- सतीश जाधव, मोहिमेतील सदस्य. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com