मिरची गॅंगच्या म्होरक्‍याला मुंबईत अटक; उद्योगपती, नेत्याच्या हत्येचा होता आरोप

मिरची गॅंगच्या म्होरक्‍याला मुंबईत अटक; उद्योगपती, नेत्याच्या हत्येचा होता आरोप


मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये उद्योगपती आणि राजकीय नेत्याची हत्या करून गेल्या एक वर्षापासून फरारी असलेल्या कुख्यात मिर्ची गॅंगच्या म्होरक्‍यास मुंबईमध्ये जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी वेश बदलून गेल्या एका वर्षापासून मुंबईत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. प्रवीण ऊर्फ आशू ऊर्फ आकाश सिंग (32) असे अटक आरोपीचे नाव आहे. विलेपार्ले पश्‍चिम येथील इर्ला मार्केटजवळील आलुवाडी येथे तो राहत होता. ओळख पटू नये म्हणून त्याने दाढी वाढवली होती व तेथेच भाजीविक्रीचा व्यवसाय करत होता. 

आरोपी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी आहे. सप्टेंबर 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात आरोपी व त्याच्या साथीदारांनी दिवसाढवळ्या चारचाकी वाहनातून येत भाजपचे स्थानिक नेते राकेश शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच या वर्षी जानेवारीमध्ये नोएडातील प्रसिद्ध उद्योगपती गौरव चांडेल (45) यांचीही आरोपीने डोक्‍यात गोळ्या घालून हत्या केली होती व त्यांची कारही चोरून नेली होती. सहा राज्यांत धडक मोहिमा राबवूनही तो पोलिसांना सापडत नव्हता. 
अशात आरोपी हा नाव व वेश बदलून मुंबईमध्ये राहत असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने एकता नगर (कांदिवली पश्‍चिम), बेहराम बाग (जोगेश्वरी पश्‍चिम), इर्ला मार्केट/प्रेमनगर (विलेपार्ले पश्‍चिम) परिसरात पाळत ठेवली होती. अखेर त्यास आज विलेपार्लेतील इर्ला मार्केटमधून ताब्यात घेतले. 

आरोपीवर अडीच लाखांचे बक्षीस 
मुख्य आरोपी प्रवीण उत्तर प्रदेशमध्ये मिर्ची गॅंग नावाने कुप्रसिद्ध टोळी चालवत होता. मिर्ची गॅंगच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. मुख्य आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, चोरी, शस्त्राचा वापर, गुन्हेगारी टोळी चालविणे वगैरे स्वरूपाचे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com