Mumbai : प्रादेशिक पक्षांमुळे भाषिक भेद ! भालचंद्र नेमाडे Mumbai Linguistic differences regional parties! Bhalchandra Nemade | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालचंद्र नेमाडे

Mumbai : प्रादेशिक पक्षांमुळे भाषिक भेद ! भालचंद्र नेमाडे

मुंबई : भाषेला कधीही सीमा आणि मर्यादा नव्हत्या. मराठी, हिंदी, गुजराती या भाषेत काही फार मोठे फरक नाहीत; परंतु प्रादेशिक पक्षांमुळे भाषिक भेद बरेच वाढले. आपणही हा भेद अधिक करत सुटलो; मात्र भाषिक पातळीवर निर्माण झालेली दरी राजकमल प्रकाशनाच्या किताब महोत्सवातून दूर केली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी केले. राजकमल प्रकाशनच्या किताब उत्सवाच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.

हिंदी पुस्तकविश्वात प्रसिद्ध असलेल्या राजकमल प्रकाशनच्या ‘राजकमल किताब उत्सवा’ला आजपासून वरळी येथे सुरुवात झाली. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, हिंदी साहित्यिक अब्दुल्ल बिस्मिल्लाह, राजकमल प्रकाशनचे अशोक महेश्वरी आदी उपस्थित होते. राजकमल प्रकाशनने नुकतेच ७६ वर्षांत पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर मुंबईत किताब उत्सव आयोजित करण्यात आला. यापूर्वी अलाहाबाद, वाराणसी, पाटणा, चंडीगड येथे किताब उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महेश्वरी यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

नेमाडे म्हणाले, दक्षिणेत प्रसिद्ध झालेले सांबार हे मूळ मराठीच होते. ते आज जगभरात गेले. त्यामुळे पूर्वी भाषेला काहीही मर्यादा नव्हती; परंतु हल्ली आपण पायाभूत चर्चा विसरलो आणि भाषिक भेद करत बसलो. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमुळे देशातील विविध भाषेंमधील दरी वाढली; मात्र राजकमल प्रकाशनसारख्या संस्थेने विविध भाषांमधील साहित्यिक आस्वाद वाचकांपुढे किताब उत्सवाच्या माध्यमातून आला.

पुस्तकात चांगले काही नसेल, तर लोक टाकून देतात आणि चांगले पुस्तक राखून ठेवले जाते. पुस्तकामध्ये केवळ लेखकाचीच नव्हे, तर प्रकाशक, मुखपृष्ठकार, मुद्रितशोधक, वाचक आदी अनेकांची महत्त्वाची भूमिका असते. पुस्तक लिहिताना माझ्याजवळ आई-वडिलांची पुण्याई होती. त्याचा प्रभाव त्यावर पडला; मात्र पुस्तके लिहिणे, ती वाढवणे ही सर्वात मोठी समाजसेवा असल्याचे नेमाडे म्हणाले.

राजकमल प्रकाशनने ‘उचल्या’ हे पुस्तक ‘उचक्का’ म्हणून हिंदीत आणून मला देशभरात ओळख दिली. आमच्या जगण्यातील वास्तव जगभरात पोचवले. आम्ही आजही स्वतंत्र नाही म्हणून आम्हाला गावात येऊ दिले जात नाही. त्याची ओळख राजकमल प्रकाशनने मला करून दिली. सामाजिक विषयाला स्पर्श करून त्या साहित्यिकाला न्याय देऊन नवीन भारत जोडण्याचे काम केले.

- लक्ष्मण गायकवाड, लेखक.