Mumbai : यकृतदानाने आईने वाचवले चिमुकल्याचे प्राण Mumbai liver donation First Robotic Liver Donor Hepatectomy Successful | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Organ Donation

Mumbai : यकृतदानाने आईने वाचवले चिमुकल्याचे प्राण

मुंबई : चयापचयाशी संबंधित यकृताच्या क्रिग्लर नज्जर सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या बाळावर यशस्वी प्रत्यारोपण करून त्याला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई काहीही करू शकते याचा प्रत्यय यानिमित्त आला. संबंधित बाळाच्या आईने आपल्या यकृताचे दान केल्याने त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. पश्चिम भारतातील ती पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.

अहमदाबादमधील आठ महिन्यांचा मुलगा मोहम्मद अब्दुल कादर जुफना याला दोन महिन्यांपूर्वी ‘क्रिग्लर नज्जर सिंड्रोम’ यकृताच्या आजाराचे निदान झाले. गंभीर बाब म्हणजे त्याच्या मोठ्या भावाचाही अशाच आजाराने मृत्यू झाला होता. मोहम्मदला कावीळ, जुलाब, उलट्या आणि सतत ताप येत असल्याने तातडीने प्रत्यारोपणासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जिवंत दात्याकडून त्याच्यावर तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज होती.

त्यासाठी कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर बाळाची आई आपल्या यकृताचा एक भाग दान करण्यासाठी पुढे सरसावली. ग्लोबल रुग्णालयाचे संचालक आणि यकृत, स्वादुपिंड व आतडे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबल यांच्या नेतृत्वाखालील टीमने रोबोटिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आणि मुलाला जीवदान दिले.

डॉ. चौबल यांनी सांगितले, की रोबोटिक डोनर हेपेटेक्टॉमीमुळे रुग्णाला विविध फायदे होतात. त्यासाठी शरीराला मोठी चीर पाडण्याची गरज नसते. कंबरेखाली अगदी लहान चीर पाडली जाते. रोबोटिक प्रणालीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आणि नियंत्रण येते. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्रावाचे प्रमाणही कमी होते. ओपन हेपेटेक्टॉमीच्या तुलनेत गुंतागुंत होण्याचे प्रमाण कमी आहे. संसर्गाचा धोकाही कमी असतो. रुग्णही लवकर बरा होतो.

पश्चिम भारतात पहिल्याच प्रयत्नात एंड टू एंड (स्किन टू स्किन) पहिली रोबोटिक डोनर हेपेटेक्टॉमी करण्यात आली आहे. अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितले.

मोठा मुलगा हिरावला!

मोहम्मद अब्दुल कादर जुफना याच्या मोठ्या भावाचाही अशाच आजाराने मृत्यू झाला होता. मात्र मोहम्मदच्या आईने त्याच्यावरील उपचारांसाठी स्वतःच्या यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनीही त्यासाठी समुपदेशन केले होते.

आमच्या मुलाच्या दुर्मिळ आनुवंशिक आजारामुळे आम्ही तणावाखाली होतो. माझ्या पत्नीने आपल्या यकृताचा काही भाग दान केला. डॉक्टरांचे आणि संपूर्ण टीमचे विशेष आभार, अशा शब्दांत रुग्णाचे वडील अब्दुल कादर जुफना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.