
Mumbai Local Train : एसी लोकलमध्ये ‘फुकट्यांची’ गर्दी ! तिकीट तपासणी मोहीम सुरू
मुंबई : उन्हाळाच्या चटकेपासून बचावासाठी फुकट्या प्रवाशांनी आता एसी लोकल कडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे एसी लोकलचा पासधारकांना गर्दीचा सामना कारवाया लागत आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे कार्यालयाने एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसात ७९८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून ३१ मे अखेर ही कारवाई सुरू राहणार आहे.
मुंबईत दमट हवामान त्यातच उन्हाळा आला की, लोकलच्या प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धावत घेतात. या कालावधीत एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढते. मात्र त्याच बरोबर उन्हाळाच्या उकाळ्यापासून बचावासाठी फुकटे सुद्धा एसी लोकलमध्ये शिरकाव करतात. यांची संख्या सुद्धा उन्हाळ्यात सगळ्यात जास्त असल्याचे निदर्शनात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवासी मोठ्या संख्येने लोकलमध्ये प्रवास करत असल्याच्या तक्रारी वातानुकूलित तिकीट-पासधारकांच्या वाढत असल्याने मध्य रेल्वेकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.एसी लोकलमध्ये १९ मे पासून तपासणी मोहिम सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी २५७ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
२२ मे अखेर एकूण ७९८ विना तिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. सकाळी सात ते रात्री ११ या कालावधीतील रोज ४५ लोकल फेऱ्यांमध्ये तपासणी करण्यात येणार आहेत.रेल्वे तिकीट तपासणीसांसह रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी असे एकूण १६ कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
एसी लोकलच्या ५६ फेऱ्या
मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी होण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकल चालविण्यात येतात. मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला एसी लोकलच्या ५६ फेऱ्या चालविण्यात येतात.या फेऱ्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा दरम्यान धावत आहे. दररोज ५० हजारपेक्षा जास्त प्रवासी या एसी लोकलमधून प्रवास करत आहे.