कर्जमाफीचे निकष अर्थविभागाच्या पथ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

तिजोरीवरचा भार हलका राहण्याची चिन्हे; नियमांतूनच मोठ्या प्रमाणात शेतकरी बाद होणार

तिजोरीवरचा भार हलका राहण्याची चिन्हे; नियमांतूनच मोठ्या प्रमाणात शेतकरी बाद होणार
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी सरकारच्या तिजोरीवर फारसा आर्थिक बोजा टाकणार नसल्याने अर्थविभागातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. कर्जमाफीसाठी सरकारने घातलेल्या निकषामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्‍यता असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भार हलका होण्याचे चिन्हे आहेत.

आतापर्यंत 42 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून, सरकारी निकषामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे अर्थविभागातील सूत्रांचे मत आहे. राज्य सरकारने सध्याच्या 89 लाख कर्जदार शेतकऱ्यांची यादी समोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट मत अर्थविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने व्यक्‍त केले. मात्र गरजू व निकषांत बसणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी निश्‍चित मिळणार असल्याचा दावाही या अधिकाऱ्यांने केला.
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची पुरवणी मागण्यांची तरतूद कर्जमाफीसाठी केली आहे. मात्र एवढ्या रकमेची गरज पडणार नाही अशी चर्चा अर्थविभागात सुरू आहे. कर्जमाफीचा निर्णय घेण्या अगोदरच अर्थविभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारला फार तर दहा ते अकरा हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी होईल अशाप्रकारची योजना तयार करण्याची सूचना केली होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांचा दबाव आणि मागणी पाहता सरसकट 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतरच्या आदेशात ऑनलाइन अर्ज भरताना घातलेले निकष पाहता लाखो शेतकरी या योजनेपासनू "ऑनलाइन' अवैध ठरणार असल्याचे आरोप शेतकरी संघटना व विविध विरोधी राजकीय पक्षांनी केले होते. मात्र पारदर्शकता व गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचा सरकारचा आग्रह असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धती राबविण्यात आली. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर दिवाळीपूर्वीच दिला जाईल. 1 ऑक्‍टोबरनंतरही ही रक्‍कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची एकूण संख्या जाहीर करण्यास सरकारला डिसेंबर व जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल, असा दावाही सूत्रांनी केला आहे.

कर्जमाफीची प्रक्रिया
89 लाख कर्जदार शेतकऱ्यांची यादी समोर ठेवून घोषणा
अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची तपासणी सुरू
1 ऑक्‍टोबरनंतरही ही रक्‍कम टप्प्याटप्प्याने
कर्जाची रक्‍कम दिवाळीपूर्वीच मिळणार
एकूण संख्येसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहवी लागणार

Web Title: mumbai maharashtra news Debt Waiver Criteria on the path of division