विटा शहराचा पाणीप्रश्‍न सोडवणार - डॉ. रणजित पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - वाढीव लोकसंख्येमुळे बिकट झालेल्या विटा शहरातील नागरिकांच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी (ता. 8) विधानसभेत दिले.

मुंबई - वाढीव लोकसंख्येमुळे बिकट झालेल्या विटा शहरातील नागरिकांच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी (ता. 8) विधानसभेत दिले.

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्यावरील उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

विटा शहराची लोकसंख्या 30 हजारांनी वाढली आहे. 25 वर्षांपूर्वी निम्म्या लोकसंख्येच्या आधारावर पाणीपुरवठा योजना आखण्यात आली होती. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सुधारित योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; मात्र तो नगरविकास विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित होता. एप्रिल 2017 पासून शहरात अनियमित पाणीपुरवठा आणि तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची बाब बाबर यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसांच्या आत संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलवण्यात येईल. यातील सूचना आणि सुधारणा यांचा समावेश करून तातडीने या नवीन पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news solve the water problem of Vita City