
चित्रवाणी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना शरीरविक्रयात ढकलणाऱ्या कथित दिग्दर्शकाला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे.
मुंबई - चित्रवाणी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना शरीरविक्रयात ढकलणाऱ्या कथित दिग्दर्शकाला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. त्याच्या तावडीतून दोन टीव्ही मालिकांमधील मॉडेल तरुणींची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मॉडेल व अभिनेत्रींना शरीरविक्रयात ढकलण्याचे रॅकेट महाराष्ट्रातील मुंबईसह गुजरात व अन्य राज्यांत चालवण्यात येत होते. या प्रकरणी पोलिसांच्या समाजसेवा शाखेने सहावान अली ऊर्फ मुन्ना चनई कविराज (45) या कथित दिग्दर्शकाला अटक केली आहे. सहावान अली हा टीव्ही मालिका व वेब सीरिजचा दिग्दर्शक असल्याचे सांगून उत्तर प्रदेश, बिहार व दिल्ली येथून मॉडेल बनण्यासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणींना जाळ्यात अडकवत असे.
या तरुणींचा वापर शरीरविक्रयासाठी केला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी निरीक्षक संदेश रेवले यांना मिळाली होती. समाजसेवा शाखेने एका बोगस ग्राहकाद्वारे सहावान अली याच्याशी संपर्क साधून तरुणीची मागणी केली होती. त्यानुसार तो गोरेगाव आरे वसाहतीजवळील "हॉटेल रॉयल पाम' या ठिकाणी दोन तरुणींना घेऊन आला आणि पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकला.
पोलिसांनी सहावान अली याला अटक करून त्याच्या ताब्यातील दोन तरुणींची सुटका केली. या तरुणी टीव्ही मालिकांत छोट्या-मोठ्या भूमिका करत असल्याचे चौकशीत समोर आले. सहावान अली हा परराज्यांतून येणाऱ्या तरुणींना टीव्ही व वेब मालिकांत भूमिका देऊन त्यांच्याकडून शरीरविक्रय करून घेत होता.
व्हॉट्सऍपवरून व्यवहार
पोलिसांनी अटक केलेला सहावान अली ऊर्फ मुन्ना गुजरात व अन्य राज्यांतील राजकीय नेते, व्यावसायिकांना मुली पुरवत होता. हे सर्व काम व्हॉट्सऍपवरून केले जात असे. तो या तरुणींची छायाचित्रे व्हॉट्सऍपवर टाकून 25 हजार ते पाच लाख रुपये दर सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.