धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपल्याचा आरोप

दिनेश चिलप मराठे
रविवार, 8 जुलै 2018

लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपला असून तो अहवाल सार्वजनिक करत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती स्व. धीरूभाई अंबानी यांनी मुंबई पुणे हायवेवरील लोधीवली येथील स्वतः उद्घाटन केलेले हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु ठेवण्याची मागणी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपला असून तो अहवाल सार्वजनिक करत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. सिटीझन डॉक्टर फोरम आणि रुग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी पत्रकार संघात लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल सुरळीतपणे सुरु ठेवण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून परिसरातील गोरगरीब व गरजू जनतेला तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांची अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तातडीने मिळावी या हेतूने या रुग्णालयाची उभारणी केली. रायगड जिल्ह्यातील प्रथम आणि मोठे HIV PPP (सरकारी-खाजगी) तत्वावर चालणारे सेंटर या रुग्णालयात कार्यरत आहे. सुरवातीचा काही काळ वगळता एकूणच रुग्णालयाकडे दुर्लक्ष झालेले आढळून येते. आज या रुग्णालयाची झालेली दयनीय अवस्था आणि परिसरातील रुग्णांची झालेली गैरसोय बाबतीत Whistleblower डॉ. संजय कुमार ठाकूर यांनी लक्ष वेधले.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या हॉस्पिटलमध्ये मुकेश अंबानी सीएसआर निधी कशा वापरु शकतात यावर आश्चर्य व्यक्त करत प्रतिपादन केले की धीरुभाई यांनी एका उदात्त हेतूने सुरु केलेले कार्य अंबानी कुटूंबियांनी पुढे न्यावे. 2017 मध्ये उप संचालक, आरोग्य विभाग, मुंबई मंडळाने केलेल्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी गलगली यांनी केले. डॉ. एच. एस. बावसकर यांनी चांगले आणि सुव्यवस्थित धीरूभाई अंबानी हॉस्पिटल बंद करण्याचा सुरु असलेल्या प्रयत्न बाबत चिंता व्यक्त केली. डॉ. एम. मिरजकर यांनी धीरूभाई अंबानी हॉस्पिटल पूर्ववत सुरु करण्याचे आवाहन शासनास केले. डॉ. अभिजीत मोरे यांनी स्थानिकांना आधार देण्यासाठी हे धीरूभाई अंबानी हॉस्पिटल कार्यरत ठेवणे काळाची गरज आहे. अॅड. जयंत एम. चितळे यांनी सांगितले की सामाजिक उत्तरदायित्वची भूमिका बघता ही निव्वळ फसवणूक आहे आणि पोलखोल करू. यावेळी एसएम ठाकूर, एकनाथ सांगळे, स्वाती पाटील, जितेंद्र तांडेल, सीएम कुळकर्णी, अॅड विल्सन गायकवाड आणि विनोद साडविलकर उपस्थित होते. लोधीवली, चौक, मोहापाडा, तुपगांव, टेंभरी, चांभार्ली, वडगांव, कर्जत, नेरळ, माथेरान येथील रहिवाशी, रायगड जिल्हा व्यापारी असोसिएशन आणि रायगड मधील HIV बाधित रुग्ण, जुना मुंबई-पुणे महामार्गाचे प्रवासी, तसेच पाताळगंगा, रसायनी, खालापुर औद्योगिक क्षेत्रातील कामगार यांची मागणी आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mumbai Marathi Journalists Association questioning about Government reports on Dhirubhai Ambani hospital inquiry report