डॉ. अमरापूरकर मृत्यू प्रकरण : गटार उघडे ठेवणाऱ्या चौघांना अटक

अनिश पाटील
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

29 ऑगस्टला अमरापुरकर दुपारी रुग्णालयातून प्रभादेवी येथील घराच्या दिशेने त्यांच्या खासगी कारने निघाले होते. सोबत चालकही होता. एलफिन्स्टन परिसरात पाणी कंबरे एवढे असल्यामुळे त्यांची गाडी अर्धा तास तेथे पडली होती.

मुंबई : मुसळधार पावसात भूमिगत गटारात (मॅनहोल) पडून वाहून गेलेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्‍टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी दादर पोलिसांनी अखेर चार स्थानिकांना शनिवारी अटक केली. पावसाचे पाणी घरात पाणी शिरू नये, म्हणून त्यांनी गटाराचे झाकण उघडे ठेवले होते. 

सिद्धेश अशोक भालेकर (25), राकेश जनार्दन कदम (38), निलेश जनार्दन कदम (33) व दिनार रघुनाथ पवार (36) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते सर्व एलफिन्स्टन रोड येथील रहिवासी आहेत. घरात पाणी शिरू नये, यासाठी या चौघांनीच तेथील गटाराचे झाकण उघडले होते, अशी माहिती सहाय्यक पोलिसा आयुक्त सुनील देशमुख यांनी दिली. याच उघड्या गटारात बॉम्बे रुग्णालयाचे डॉक्‍टर दिपक अमरापूरकर 29 ऑगस्टला वाहून गेले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चारही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

29 ऑगस्टला अमरापुरकर दुपारी रुग्णालयातून प्रभादेवी येथील घराच्या दिशेने त्यांच्या खासगी कारने निघाले होते. सोबत चालकही होता. एलफिन्स्टन परिसरात पाणी कंबरे एवढे असल्यामुळे त्यांची गाडी अर्धा तास तेथे पडली होती. त्यावेळी त्यांनी पत्नीला दूरध्वनी करून आपण एलफिन्स्टन येथे असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांनी चालकाला गाडीत थांबून स्वतः पायी घराच्या दिशेने निघाले. पण ते घरी पोहोचलेच नाही.

अखेर त्यांचा चालक घरी पोहोचल्यानंतर सर्वजण एलफिन्स्टन परिसरात त्यांचा शोध घेण्यासाठी आले. त्यावेळी दोन प्रत्यक्ष दर्शिंनी 55 वर्षीय व्यक्तीला गटारात वाहून जाताना पाहिल्याचे सांगितले. या गटाराच्या शेजारी अमरापूरकर यांची छत्रीही सापडली आहे. बुधवारी युद्धवातळीवर अमरापूरकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. रात्री उशीरा शोध मोहिम थांबवल्यानंतर 31 ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजता वरळीतील तटरक्षक दलाच्या तळा शेजारी असलेल्या नाल्यात अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai marathi news four arrested in dr amrapurkar death case