एसटी महामंडळाला ड्रेस कोडबाबत महत्वाच्या सूचना

प्रशांत कांबळे
Wednesday, 27 January 2021

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड सक्तीचा केल्यानंतर आता याच आदेशाची अंमलबजावणी एसटी महामंडळातही करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई  : मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड सक्तीचा केल्यानंतर आता याच आदेशाची अंमलबजावणी एसटी महामंडळातही करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत. 

शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेवरूनच आस्थापनेची एक विशिष्ट छाप अभ्यागतांवर पडते. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेशभूषेबद्दल जागरुक राहून कार्यालयास आपली वेशभूषा किमान अनुरूप ठरेल याबाबत काळजी घेणे अभिप्रेत आहे. त्यानुसार मंत्रालय तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेहराव निश्‍चित करून दिला आहे.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्या वाचा एका क्लिकवर

त्याप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना साडी, सलवार, चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅण्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्‍यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅण्ट, ट्राऊझर पॅण्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. त्यासोबतच जीन्स-टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये. तसेच आठवड्यातून किमान एकदा खादी कपडे परिधान करावेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. याच सूचना आता एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. 
--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai marathi news Important instructions regarding dress code to ST Corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news Important instructions regarding dress code to ST Corporation