'सुविधा नाहीत तर कर नाही' : प्रशासनाविरोधात कल्याणकर एकवटले

सुचिता करमरकर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पालिकेत 1995 पासून लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. प्रशासकीय राजवट असताना शहरातील  काही रस्ते रुंदीकरणात मोठे झाले. यात यु पी एस मदान यांचा विशेषाने उल्लेख केला जातो.

कल्याण : सुविधा नाहीत तर करही नाही या भूमिकेला पाठींबा देण्यासाठी कल्याणकर नागरिक एकत्र आले असून त्यासंदर्भात एक बैठक शनिवारी रात्री पार पडली. सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास घाणेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते सुलेख डोन यांच्यासह काही मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या सर्व सामान्य नागरिकांनी १६ सप्टेंबरला २०१७ रोजी संध्याकाळी विविध प्रश्नावर चर्चा केली.  पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या सर्व सामान्य नागरिकांनी यावेळी शहरातील समस्यांवर काय तोडगा काढता यईल ? सुस्त झालेल्या लोकप्रतिनधींना कसा जाब विचारला जाईल ? भ्रष्टाचारात गुंतलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना कसे वठणीवर आणलं जाईल ? अशा अनेक विषयांचा उहापोह या बैठकीत केला. 

शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय क्षमता असणारे अधिकारी आता दुर्मिळ झालेत म्हणूनच या कल्याण डोंबिवली शहराची अशी अवस्था झाल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. शहरातील करदाते नागरिक एकत्र येऊन महानगरपालिकांच्या विरुद्ध  दोन ऑक्टोबरपासून असहकार चळवळ राबवणार आहेत. नागरिकांकडून कोट्यावधी रुपयांचा कर गोळा करून मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी असमर्थ ठरलेल्या पालिका प्रशासनाला कोणताही कर द्यायचा नाही असा सूर एक मुखाने मांडण्यात आला.   

आधारवाडी डम्पिंग, अरुंद रस्ते, फेरीवाले,  भ्रष्टाचारात सहभागी असलेले अधिकारी तसेच लोकप्रनिधी, दुकानदारांनी काबीज  केलेले फूटपाथ, वर्षानुवर्षे अरुंद नाले,  प्रदूषित केलेली वालधुनी नदी, शहरात अनेक साथीचे आजार पसरण्याची असलेली भीती, अपुरी हॉस्पिटल यंत्रणा, भूखंड माफिया, चाळमाफिया, लबाड बिल्डर्स, निद्रिस्त नेते, वाहतुकीचा प्रश्न, बेशिस्त रिक्षावाले, त्यांचे मुजोर नेते, शहरातील वाढती लोकसंख्या, पाणी प्रश्न, सत्तावीस गावांचा विषय, मोकळे मैदाने, आरक्षित भूखंड अशा असंख्य विषयांबाबत कल्याण डोंबिवलीतील सत्ताधारी  झोपेत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai marathi news kalyan taxpayers unite against administration