उत्तरपत्रिका नसलेल्या 1600 विद्यार्थ्यांना सरासरी गुण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

ज्या १६०० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रथमदर्शनी आढळून येत नाही अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली

मुंबई : निकालाचा गोंधळ घालणाऱ्या मुंबई विद्यापीठाला हरवलेल्या उत्तरपत्रिका शोधण्यात आलेले अपयश लक्षात घेत 1600 विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. निकाली गोंधळ घालणाऱ्या मेरिट ट्रेक कंपनीची सेवाही मुंबई विद्यापीठ आगामी सत्र परीक्षांकरिता वापरणार आहे. मेरिट ट्रेक कंपनीमुळेच निकाल रखडला असताना मुंबई विद्यापीठाने याच कंपनीची सेवा कायम करून चांगलाच धक्का दिला. 

गुरुवारी मध्यरात्री याबाबतची अधिक्रुत माहिती देण्यात आली. गुरुवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास ज्या १६०० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रथमदर्शनी आढळून येत नाही अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली असून, अशा विद्यार्थ्यांना गुण प्रदान करण्यासाठी नियमावली तयार करूनच गुण प्रदान करण्यात यावेत असे ठरविण्यात आले. 

द्वितीय सत्र २०१७ च्या परीक्षांचेही संगणकाआधारित मुल्यांकन केले जाणार असून त्यासाठी हे कंत्राट मेरिट ट्रेक कंपनीसोबत १ वर्षासाठी करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र त्यासाठी या एजेन्सीच्या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये आवश्यक ते बदल करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी असेही परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरले.

Web Title: mumbai marathi news mumbai university results