महापौरपदाची उत्कंठा कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मार्च 2017

शिवसेनेची मोर्चेबांधणी; भाजपची आज बैठक

शिवसेनेची मोर्चेबांधणी; भाजपची आज बैठक
मुंबई - भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना स्वबळावर महापौर बसवण्याची संधी मुंबईकरांनी नाकारल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये आपलाच महापौर बसवण्याच्या राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. दोन्ही पक्षांनी सावधपणाने आपले राजकीय डावपेच सुरू केल्यामुळे "मुंबईचा महापौर कुणाचा' याबाबत कुतूहल आहे. अपक्षांना गळाला लावत शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, तर उद्या (ता. 3) भाजपच्या सुकाणू समितीची बैठक होणार आहे, त्यामुळे महापौरपदाची उत्कंठा कायम राहिल्याचे चित्र आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार उभा करायचा की शिवसेनेशी जुळवून घ्यायचे, यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची बैठक उद्या होत आहे. कोणत्याही परिस्थितीत महापौर निवडून आणण्याचा निर्धार केलेल्या शिवसेनेने जोरात मोर्चेबांधणी चालवली आहे. महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपकडून सर्व शक्‍यता पडताळून पाहिल्या जात असून, दोन्ही पक्षांनी आपल्या डावपेचांबाबत ताकास तूर लागू दिला नाही.

मुंबईत स्वबळावर महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेना किंवा भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्तावाटपाचे सूत्र निश्‍चित करावे, अशी भावना शिवसेना- भाजपमध्ये आहे. मात्र, महापालिकेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर युतीसाठी पुढाकार कुणी घ्यायाचा, हा प्रश्न आहे. ज्यांनी युती तोडली त्यांनीच हात पुढे केल्यास पुन्हा एकत्र येण्याबाबत विचार केला जाईल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे; तर एकदा युती तोडल्यानंतर भाजपच्या दारात जायचे नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतली आहे. भाजपने एकत्र येण्यासाठी प्रस्ताव दिला तरी भाजपचे सत्तावाटपाचे सूत्र शिवसेनेसाठी हानिकारक असल्याने भाजपसोबत जाऊ नये, असाही शिवसेना नेत्यांचा सूर आहे.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि भाजप आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष आणि "एमआयएम'ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. प्रत्यक्ष महापौरपदाच्या निवडणुकीत हे पक्ष नेमके कोणती भूमिका घेतील याचा अंदाज भाजपकडून घेतला जात आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर दोन्ही कॉंग्रेस, समाजवादी आणि "एमआयएम' यांनी एकत्र येऊन महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला किंवा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर शिवसेना- भाजपला सत्तेची समान संधी आहे. ही शक्‍यता गृहीत धरून मनसेचे सात, एक अपक्ष आणि गीता गवळी अशा नऊ नगरसेवकांना बाजूला वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसे झाले तर भाजपला 91 नगरसेवकांचे समर्थन मिळू शकते.

Web Title: mumbai mayor selection