मुंबई - 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर सध्या महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. अशात खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पार्किंगच्या नियमाचे उल्लंघन करीत "नो पार्किंग'मध्ये गाडी उभी केल्याचे उघड झाले आहे; मात्र सर्वसामान्यांवर कारवाई करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना महापौरांची ही गाडीच न दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबईत "नो पार्किंग झोन'मध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर 7 जुलैपासून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेकडून पार्किंगच्या नियमाची जोरदार अंमलबजावणी सुरू असताना मुंबईचे महापौर महाडेश्वर यांनी नियम धाब्यावर बसवून विलेपार्ले येथे "नो पार्किंग झोन'मध्ये गाडी उभी केल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापौरांकडून अद्याप दंड वसूल करण्यात आलेला नाही.
माझी गाडी "नो पार्किंग झोन'मध्ये उभी करण्यात आली असेल, तर महापालिकेने मला पावती पाठवावी, मी नियमानुसार दंड भरण्यास तयार आहे.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई
|