मुंबईचा पारा @ 37.6 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत ऑक्‍टोबर महिन्यात नोंदवण्यात आलेल्या तापमानात आजचे तापमान सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे ठरले. 

मुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत ऑक्‍टोबर महिन्यात नोंदवण्यात आलेल्या तापमानात आजचे तापमान सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे ठरले. 

यंदाच्या ऑक्‍टोबरमध्ये तापमानाचे दोन नवे उच्चांक झाले आहेत. याआधी 7 ऑक्‍टोबर रोजी 37.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ते ऑक्‍टोबर महिन्यातील दुसरे सर्वांत जास्त कमाल तापमान होते. ऑक्‍टोबरच्या सुरुवातीपासून तापमानाचा भडका सुरू होता. पाऊस कमी झाल्याने यंदा ऑक्‍टोबर हीट सुरुवातीपासूनच जाणवू लागली, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली होती. परिणामी, ऑक्‍टोबरमधील पहिल्या आठवड्यात कमाल तापमान सातत्याने 36 आणि 37 अंशांदरम्यान नोंदवले गेले. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही पाऱ्याचा भडका सुरू होता; मात्र गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पावसाने पारा चार अंशांपर्यंत खाली आला होता. कमाल पारा 33 अंशांवर आल्याने ऑक्‍टोबर हीटपासूनही मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. गेल्या आठवड्याच्या शेवटापासून पारा पुन्हा वाढू लागला. शनिवारी कमाल पारा 35.1 अंश सेल्सिअसवर आल्याने उकाडा पुन्हा जाणवू लागला. रविवारी कमाल पारा दोन अंशांनी खाली येत 33.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सोमवारी पारा पुन्हा 35.7 अंशांवर आला. आज पारा 37.6 अंशांवर आला. सरासरीहून मंगळवारी नोंदवलेले कमाल तापमान चार अंशांनी जास्त होते; मात्र बुधवारी कमाल पारा 36 अंश सेल्सिअसवर येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

दहा वर्षांतील ऑक्‍टोबरमधील सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद 
तारीख कमाल पारा (अंश सेल्सिअसमध्ये) 
- 17 ऑक्‍टोबर 2015 ः 38.6 
- 7 ऑक्‍टोबर 2018 ः 37.8 
- 23 ऑक्‍टोबर 2018 ः 37.6 

Web Title: Mumbai mercury @ 37.6