Mumbai Metro : नवीन मार्गाची सिडको करणार उभारणी;दोन्‍ही विमानतळांना जोडणार मेट्रो सेवा Mumbai Metro CIDCO to build new line MMRDA taken up the work Metro | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Metro News

Mumbai Metro : नवीन मार्गाची सिडको करणार उभारणी;दोन्‍ही विमानतळांना जोडणार मेट्रो सेवा

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मानखुर्दपर्यंत येणारी मुंबईची मेट्रो क्रमांक ८ आता नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधरदरम्यानच्या मेट्रोलाईन एकला जोडली जाणार आहे. त्यानंतर हीच मेट्रो लाईन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. मानखुर्द ते बेलापूर या दहा किलोमीटर मेट्रो मार्गाची उभारणी सिडको करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्ददरम्यानच्या ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो क्रमांक आठचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द या ११ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गानंतर मानखुर्द ते वाशी, सानपाडा,

जुईनगर, नेरूळ आणि बेलापूरपर्यंतच्या मेट्रो मार्गाची उभारणी आता सिडको करणार असून सरकारने या मार्गाच्या कामाला हिरवा कंदील दाखवल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.

खाडीवर मेट्रोसाठी स्वतंत्र पुलाची उभारणी

मानखुर्द ते बेलापूरपर्यंतची मेट्रो कनेक्टिव्हिटी जोडण्याकरिता डीपीआर बनवण्याचे काम युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट एजन्सी अर्थात (उमटा) या केंद्र सरकारच्या एजन्सीला देण्यात आले आहे. या मेट्रो मार्गाचा डीपीआर उपलब्ध झाल्यानंतरच या मेट्रो मार्गावर होणारा खर्च आणि त्यासाठी लागणारा कालावधी समजू शकणार आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गात वाशी खाडी येणार असल्याने खाडीवर मेट्रोसाठी स्वतंत्र पुलाची उभारणी करावी लागणार आहे.