
"झोंबायचे त्याला झोंबु दे" पुलाच्या जोडरस्त्यांच्या कामावरून सेना मनसे दरम्यान जुंपली
डोंबिवली - मोठागाव ते मानकोली पुलाचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून मे मध्ये वाहतूक सेवेत हा पूल उपलब्ध होईल असा दावा एमएमआरडीएने केला. पुलाचे तर काम होईल पण या पुलावरील वाहतुकीला जोड रस्त्यांची कामे झाली नाहीत यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत एमएमआरडीएला ही कामे तात्काळ करण्याची सूचना केली आहे.
आमदार पाटील यांच्या ट्विटनंतर शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी "पलावा जंक्शनची स्थिती मोठागाव मध्ये होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत" असे म्हणत आमदारांना सुनावले आहे. त्यावरून आमदार पाटील यांनी "मी वस्तुस्थिती मांडली ज्यांना झोंबायचे त्यांना झोंबु दे" असे म्हणत म्हात्रे यांना उत्तर दिले आहे.
मोठागाव ते मानकोली पूलाचे काम जलदगतीने सुरू आहे. या पुलामुळे ठाणे ते डोंबिवली हे अंतर वाहन चालकांना अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. या पुलाचे आणि जोडरस्त्याचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून येत्या मे महिन्यात ते पूर्ण होईल असा दावा एमएमआरडीए ने केला आहे.
यानंतर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुलाचे काम होईल परंतु त्याचबरोबर पुलाला जोड रस्त्यांची कामे देखील लवकर पूर्ण करावी. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होणार नाही असे ट्विट केले आहे. या ट्विटला शिंदे गटातून प्रतिक्रिया आली आहे.
शिवसेनेचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोठागाव ते मानकोली पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. एप्रिल मे महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होऊन डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही जे कामे करतो ती तांत्रिकदृष्ट्या व लोकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून करतो.
डोंबिवली पश्चिम मध्ये आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे. आपण पलावा जंक्शन जर बघितलं तर तेथे डेव्हलपमेंट आधी झाली आहे व पुलाचे काम आता सुरू आहे. वराती मागून घोडे असे आमचे काम नाही. जी काही कामे करतो ते लोकांना चांगले सुविधा मिळण्यासाठी करतो वाहतूक कोंडी मध्ये लोकांना दोन दोन तास अडकावे लागणार नाही.
पलावा जंक्शनची जी स्थिती आहे ती मोठा गाव मध्ये होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार झाल्यानंतर आणि आमची सत्ता आल्यानंतर विकास कामांना गती मिळाली आहे. काही झारीतले शुक्राचार्य असे असतात की त्यांना काम होऊ नये असे वाटत असते. असे म्हणत मात्रे यांनी मनसे आमदारांना यांना बोल लगावले आहेत.
यावर मनसे आमदार पाटील यांनी देखील म्हात्रे यांचा समाचार घेतला आहे. गेल्या आठ वर्षापासून या ब्रिजचे काम सुरू आहे. एप्रिल मे मध्ये पुलाचे काम पूर्ण होईल यात सांक्षकता नाही. परंतु ते काम झाल्यानंतर जी परिस्थिती ओढवणार आहे त्याच्या काही उपाययोजना यांनी केल्या आहेत का?
रेल्वेचे जे क्रॉसिंग आहे फाटक त्याच्यावर अजून ब्रिजचे काम झाले नाही. आता बोलतात ते टेंडर आलेले आहे. त्याला पर्यायी रस्ता नाही त्यामुळे भविष्यात येथे वाहन कोंडी होणार आहे. निवडणुका आल्या की ऐरोली ते काटई दहा मिनिटं, कौसा ते काटई पर्यंत एक इंच जागा अजून भूसंपादित झालेली नाही. आणि हे कसल्या बतावण्या करत आहेत.
इथला पलावाचा पूलाच्या कामाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते डिसेंबर 2018 ला ओपनिंग केलं होतं अजूनही तो लटकताच आहे. त्याला वेगळं काही सायन्स आहे का ?, दिव्याचा पूल तोही लोकसभा निवडणुकीच्या आधी ओपनिंग केलं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते. दिवा वेस्टला जायला त्याला पर्यायी रस्ता नाही. डीपी रस्त्याचे काम नाही तो ब्रिज जाणार कुठे ?
कल्याण शिळफाटा रोड या रोडवर बदलापूर जंक्शन इथे ब्रिज प्रस्तावित आहे. मानपाडाला सुयोग हॉटेलच्या इथे प्रस्तावित ब्रिज होता. आता पंधराशे कोटी मेट्रोसाठी येत आहेत. त्याचे होर्डिंग पण लागले, मग ती मेट्रो येत असताना हे ब्रिजचे काय होणार याचे काही नियोजन आहे का?
की परत त्या मेट्रोसाठी या रस्त्यांवर कोंडी होणार आहे. माझी सातत्याने हीच मागणी आहे की असे काही प्रकल्प उभारताना त्याला पर्याय रस्ता उपलब्ध करून त्या प्रकल्पांच विचार केला पाहिजे. ना की तो प्रकल्प निवडणुक आली म्हणून लोकप्रिय घोषणा करायच्या आणि मग निवडणुकीच्या तोंडावर जरा काम पुढे सरकवायचे. मी मागणी केली आहे. टीका करण्यासारखे त्याच्यामध्ये काही नाही. मी वस्तुस्थिती मांडली असून ज्याला झोंबायचे त्यांना झोंबु दे असे म्हणत शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.