
मुंबई : सर्व मातांना असेच शिवसैनिक श्रावणबाळ मिळोत; शीतल गंभीर देसाई
मुंबई: आपल्या लाडक्या मातोश्रीला दोन कोटींचे अमूल्य घड्याळ भेट म्हणून देणारे असेच शिवसैनिक श्रावणबाळ राज्यातील साऱ्या पाच कोटी मातोश्रींना मिळाले तर राज्यातील दारिद्र्य चुटकीसरशी नष्ट होईल, असा टोला भाजप महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षांच्या डायरीत मातोश्रीला दोन कोटींचे महागडे घड्याळ दिल्याची नोंद आयकर खात्याला सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मातोश्री म्हणजे आपली आई असा खुलासाही त्यांनी केला होता. त्यानंतर त्याच शिवसेना नेत्याच्या डायरीत एम मॅडम, एम ताई असाही उल्लेख असल्याची महापालिकेत चर्चा होती. त्यावरून श्रीमती देसाई यांनी हा टोमणा मारला आहे.
जन्मदात्या आईवर केलेल्या खर्चाचा, म्हणजेच आपल्या आईला दोन कोटींचे घड्याळ भेट दिल्याचा, चोख हिशोब ठेवणारे शिवसैनिक महाराष्ट्रानेच काय पण जगानेही प्रथमच पाहिले असतील. आपल्या आईला असे महागडे गिफ्ट देण्याची ऐपत पूर्वी शिवसैनिकांची नव्हती. पण महापालिकेत दीर्घकाळ सत्ता असल्याने आता साधा शाखाप्रमुखही महागड्या चेन व गाड्या घेऊन फिरतो हा विकास सर्वसामान्य जनता पहात आहे. दोन कोटींचे घड्याळ देणाऱ्या आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला " यशवंत " व्हा, असा आशिर्वाद मातोश्रीने नक्कीच दिला असेल, अशी कोपरखळीही श्रीमती देसाई यांनी लगावली आहे.
किशोरवयीन आहेत का
अशा या " यशवंत " झालेल्या शिवसेना कार्यकर्त्याच्या डायरीत एम मॅडम, एम ताई असाही उल्लेख असल्याची चर्चा आहे. अर्थात हल्लीचा एखाददुसरा उच्चस्तरीय शिवसैनिक वगळता जवळपास सारेच शिवसैनिक अजूनही परस्त्रीला माता-भगिनीसमान मानतात. मात्र या एम ताई कोण आहेत, मुख्य म्हणजे या ताई वा मॅडम या प्रत्यक्षात किशोरवयीन आहेत का. म्हणजेच त्या वयाने ज्येष्ठ असल्या तरी मनाने-वृत्तीने अजूनही किशोरीच आहेत का, याचा खुलासाही या यशवंत कार्यकर्त्याने करावा, अशी गमतीदार कोटीही श्रीमती देसाई यांनी केली आहे
Web Title: Mumbai Mothers Same Shiv Sainik Shravanbal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..