मुंबई महापालिका घेणार कचरा उचलण्याचा कर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मालमत्ता करासोबत एक ते दीड टक्के वसुली
मुंबई - मालमत्ता कराबरोबरच कचऱ्यावरही कर आकारण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. जकात रद्द होणार असल्याने उत्पन्नाचा नवा पर्याय पालिकेला शोधावा लागणार आहे. मालमत्ता कराच्या बिलातून एक ते दीड टक्के कर वसूल केला जाईल. नव्या वर्षात हा निर्णय लागू झाल्यास त्यातून पालिकेला सुमारे 100 कोटींचा महसूल मिळण्याची शक्‍यता पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली.

पालिकेला दर वर्षी जकातीतून सात हजार कोटींचे उत्पन्न मिळते. जकात कर रद्द होऊन सेवा व वस्तू कर (जीएसटी) लागू होणार आहे. जकात हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे एवढा मोठा महसूल उभा करण्यासाठी उत्पन्नाचे निरनिराळे मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालिका मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांतून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्यावर एक ते दीड टक्के कर आकारण्याचा विचार करत आहे. हा कर मालमत्ता कराच्या बिलातून वसूल केला जाईल. पालिका निवडणुकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते.

मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांकडून मलनिस्सारण कर पालिका आकारते; मात्र तेथील कचरा उचलण्यावर पालिका कर आकारत नाही. सध्या कचऱ्याचे ओला-सुका असे वर्गीकरण करण्यास मुंबईतील नागरिकांचा फारसा प्रतिसाद पालिकेला मिळताना दिसत नाही. कचरा वर्गीकरण योजनेला गती देण्याचा प्रयत्नही पालिका करत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून मात्र कचरा कर घेतला जाणार नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: mumbai municipal collected garbage tax