
Mumbai News : मुंबईकरांच्या सुरळीत प्रवासासाठी पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँट रोड उन्नत मार्ग
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन उन्नत मार्ग उभारणार आहे. हा उन्नत मार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीच्या मार्गांपैकी एक असणार आहे.
ऑरेंज गेट पूर्व मुक्तमार्ग येथून ग्रँट रोड पर्यंत मौलाना शौकत अली मार्गावर हा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महापालिकेतर्फे २२ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा काढण्यात आली आहे. तसेच, सदर कामासाठी ठेकेदाराची नेमणूक करून लवकरात लवकर यामार्गाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेचा असणार आहे.
मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिका विविध योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नवीन मार्गाची उभारणी करण्याचे प्रस्तावित केले आहे. या एकूण मार्गाची लांबी ही ५६६० मीटर इतकी आहे. अंदाजे ७७०.८५ कोटी (जीएसटी सह) इतका खर्च या मार्गाच्या उभारणीसाठी येणार आहे.
यासाठी ४२ महिन्यांच्या (पावसाळ्यासह) कालावधीसाठी निविदा मागविण्यात आली आहे. पूर्व मुक्तमार्गाच्या पी. डी. मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) अत्यंत आवश्यक आहे.
यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुखद होत मरीन ड्राईव्हच्या वाहतूक कोंडीस मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नवी मुंबईतून मुंबई शहराकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वेळेची बचतही या मार्गामुळे होणार आहे, असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
सद्यस्थितीत ग्रांट रोड ते पूर्व मुक्तमार्ग या ५.५६ किमी प्रवासासाठी ३० ते ५० मिनिटे इतका कालावधी लागतो. मात्र प्रस्तावित मार्गाच्या उभारणींनंतर हा वेळ ७ ते ८ मिनिटांनी कमी होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.
तसेच, सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर रोड, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पीडी मेलो रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या मुंबईतील मुख्य भागातील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी हा मार्ग आवश्यक ठरणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.