मुंबई महापालिकेच्या प्रसुतिगृहांत अनेक गैरसोई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - महापालिकेच्या प्रसुतिगृहांची दुरवस्था झाली आहे. सुविधा नसल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. फक्त पदे भरून या असुविधा दूर होणार आहेत का, असा सवाल विचारत नगरसेवकांनी विभागातील मॅटर्निटी होममधील असुविधांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. प्रसुतिगृहासाठी येणारा केंद्राचा निधीही खर्च न झाल्यामुळे परत जात आहे, याकडेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. 

पालिकेच्या प्रसुतिगृहांतील हंगामी पदे भरण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी पालिकेच्या प्रसुतिगृहांत सुविधा नसल्याने रुग्णांना कसा त्रास होतो, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. फक्त पदे भरल्याने सुविधा मिळतील का, असा सवालही त्यांनी केला. मोठ्या रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी प्रसुतिगृहे आहेत. अशा स्थितीमुळे नाईलाजाने रुग्णांना खासगी रुग्णालयांत जावे लागते. मग भार कमी कसा होणार, असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये नवजात बाळाला ठेवण्यासाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) नसल्याने कूपर रुग्णालयात न्यावे लागते. रावळी कॅम्प मॅटर्निटी होममध्ये सोनोग्राफी मशीन नाही. मालवणी मॅटर्निटी होममध्येही सुविधा नाहीत. पालिकेच्या इतर मॅटर्निटी होममध्येही अशा प्रकारच्या गैरसोई आहेत, याकडे नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. 

पालिकेची एकूण किती मॅटर्निटी होम आहेत, किती चालू आणि किती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत; तसेच किती चांगल्या स्थितीत चालवली जात आहेत ही माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी पालिकेची एकूण 28 मॅटर्निटी होम असून, सर्व सुरू आहेत, असे सांगितले. गैरसोईंबाबत माहिती घेऊन सांगते, असे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली. मॅटर्निटी होमबाबतच्या नगरसेवकांच्या तक्रारी दूर कराव्यात, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला केली. 

Web Title: Mumbai Municipal Corporation delivery ward issue