
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
Mumbai Politics : शिंदे यांचे धनुष्यबाण ठाकरेंचे गड भेदणार?
मुंबई - शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत ठाकरे यांच्या पक्षाचे दहा नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले आहेत. मात्र निष्ठावंत माजी नगरसेवक आणि शिवसैनिक ठाकरे यांच्या अजूनही सोबत आहेत. मुंबई जिंकण्यासाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने शिंदे आणि ठाकरे यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाच्या मदतीने शिंदे यांची शिवसेना, ठाकरे यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर आणि यामिनी जाधव या पाच आमदारांवर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाकरे गटातील नाराज माजी नगरसेवकांना शोधून त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणून ठाकरे यांचे गड भेदण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर पालिकेची महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. निवडणुकीच्या दृष्टीने दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यशवंत जाधव, शितल म्हात्रे, दिलीप लांडे यांच्यासह समाधान सरवणकर, संतोष खरात, परमेश्वर कदम, आत्माराम चाचे, खासदार राहूल शेवाळे यांच्या वहिणी वैशाली शेवाळे आणि भारती बावदाणे, मानसी दळवी आणि दत्ता नरवणकर आदी दहा माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. नगरसेवक फूटू नये यासाठी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विभागवार मेळावे सुरू आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता असून ठाकरे यांच्या पक्षात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
टार्गेट वरळी
आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात ठाकरे यांच्या गडाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा गड ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे विविध कार्यक्रम राबवित आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या आधी माजी नगरसेवक संतोष खरात आणि माजी नगरसेविका मानसी दळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळीतील हे तीन नगरसेवक शिंदे गटाला मिळाल्यामुळे येथे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.