सायन परिसरात यंदा ‘तुंबई’ नाही

 सायन परिसरात यंदा ‘तुंबई’ नाही
सायन परिसरात यंदा ‘तुंबई’ नाही

मुंबई : पावसाळ्यामध्ये सायन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तुंबणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठी मुंबई महापालिका छोट्या नाल्यांची रुंदी वाढवणार आहे. सर्व नाले मोठे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वर्षभरात त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे पाणी साचण्याच्या त्रासापासून राहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

सायन परिसरातील सरदार नगर, अँटॉप हिल, गांधी मार्केट आदी भागांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. पाण्याचा निचरा होण्यास खूप विलंब लागत असल्यामुळे, परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्याबाबत राहिवाशांनी अनेक तक्रारीही केल्या होत्या. त्याबाबत पालिका विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक रवी राजा यांनी स्थायी समितीसह मुंबई महापालिका सभागृहात अनेकदा आवाज उठवला.

अखेर महापालिकेने संबंधित भागातील छोट्या नाल्यांची रुंदी व खोली वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांची तुंबणाऱ्या पाण्यापासून मुक्तता होणार आहे. नालेरुंदीकरणामध्ये ट्रान्झिट कॅम्प, इंदिरा नगर, कोकरी आगार आदी भागांतील नाल्यांची उंची वाढवण्यात येणार आहे. सर्व कामांसाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. नाल्याची कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे. त्यामुळे २०२१ चा पावसाळा स्थानिक नागरिकांना दिलासा देणारा ठरणार आहे.


पावसाळ्यात सायन आणि परिसरातील राहिवाशांना फारच त्रास सहन करावा लागतो. त्याबाबत पालिका सभागृहात मी अनेकदा आवाज उठवला होता. त्यानंतर नाल्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेता
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com