VIDEO: मुसळधार पावसाचा फटका, पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या OPDत पाणीच पाणी

भाग्यश्री भुवड
Wednesday, 23 September 2020

मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत पावसाने जोर धरल्यानं अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. याचा फटका नायर रुग्णालयाला ही बसला आहे. नायर रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पाणीच पाणी साचले आहे.

मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाचा फटका वाहतुकीवरही झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यातच मुंबईतल्या पावसामुळे नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुडघाभर पाणी साचले आहे. 

रुग्णालयाच्या बाहेरच पाणी साचल्यानं नागरिकांना रुग्णालयात येणं आणि बाहेर जाणं अवघड झालं आहे. मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत पावसाने जोर धरल्यानं अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. याचा फटका नायर रुग्णालयाला ही बसला आहे. नायर रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या लोकांचे काहीसे हाल झाले.

मुंबईत मंगळवार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाला. पावसामुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबले. माटुंगा आणि हिंदमाता परिसर पाण्याखाली गेला. काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली. पावसाचा मुंबईतील रुग्णालयांना ही फटका बसला. रस्त्यावर पाणी साचल्याने यात काही वाहनांचे नुकसान झाले.    

सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण काहीसे वाढू लागल्याने महत्वाची रुग्णालये नॉन कोविड केली जात आहेत. त्यामुळे उपचारांसाठी सर्व रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. लोकांसह ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांना ही पावसाचा फटका बसला.

पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्रास नको म्हणून पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. शिवाय काही कर्मचाऱ्यांना ही पाणी उपसण्याच्या कामाला जुंपण्यात आले. मात्र नायर रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे मात्र  हाल झाले.

----------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Nair Hospital COVID 19 dedicated hospital flooded following heavy rainfall


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Nair Hospital COVID 19 dedicated hospital flooded following heavy rainfall