मुंबईत आघाडीत बिघाडीच!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - समविचारी पक्षांची मोट बांधण्यात कायम आघाडीवर असलेल्या कॉंग्रेसने यंदा मात्र "सवतासुभा' कायम राखण्याचा निर्धार पक्‍का केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा कोणत्याही क्षणी बिगुल वाजण्याची शक्‍यता असताना या दोन्ही पक्षांत मात्र कोणताही संवाद नसल्याने स्थानिक कार्यकर्ते मात्र अचंबित झाले आहेत. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आघाडीच्या सर्व शक्‍यता नाकारल्या असून, कॉंग्रेस स्वबळावरच निवडणुकीला समोर जाणार असल्याचे स्पष्ट केले.

मागील निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती. या वेळी मात्र आघाडीची कोणतीही शक्‍यता नसल्याने राष्ट्रवादीने देखील अस्तित्वाची लढाई समजून प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना होत आहे. कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी परस्परांना सहकार्य करत गटबाजीला मूठमाती देण्याचे धोरण स्वीकारल्याने राष्ट्रवादीसमोर यंदा मोठे आव्हान असेल.

मुंबई राष्ट्रवादीला अद्यापही फारसे मजबूत संघटन उभे करण्यात यश आलेले नाही. विधानसभा निवडणुकीत मुंबईत राष्ट्रवादीचा एकही आमदार विजयी झालेला नाही. अशा परिस्थितीत कॉंग्रेससोबत आघाडी करून लढण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांची असली, तरी कॉंग्रेसचा प्रतिसादच नसल्याने स्वबळाशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला जात आहे.

मुंबईतला दुरावा कायम असला, तरी ठाणे महापालिकेत मात्र राष्ट्रवादीने कॉंग्रेसला सोबत घेण्याची तयारी केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई असली तरी ठाण्यात कॉंग्रेसची परिस्थती अत्यंत बिकट आहे. पण, समविचारी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी ठाण्यातील दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आघाडीचा निर्णय घेतला आहे. लवकरच या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची देखील बोलणी सुरू होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: mumbai ncp-congress alliance problem