मुंबईत ठराविक जागांवर राष्ट्रवादीचे लक्ष केंद्रित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसला या निवडणुकीत 22 ते 25 च्या आसपास जागा जिंकण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. 

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिंकून येण्याची दाट शक्‍यता असलेल्या काही ठराविक जागांवरच लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 14 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला या वेळेस 22 जागा जिंकण्याची आशा आहे. 

मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची ग्रामीण भागाप्रमाणे ताकद नाही. त्यामुळे मुंबईच्या 227 प्रभागांत उमेदवार उभे करून प्रचार यंत्रणा राबवण्यापेक्षा काही ठराविक ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची रणनीती पक्षाने अवलंबली असून त्यानुसार सध्या प्रचार सुरू आहे. 

मुंबईतील वरळी, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, अणुशक्‍तीनगर आदी भागांतील प्रभागांवर बारीक लक्ष ठेवून प्रचार राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ मानखुर्द येथून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाढवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी खासदार संजय पाटील, प्रवक्‍ते माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाची ताकद ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणच्या उमेदवारांना सक्षम पाठबळ द्यायचे अशी रणनीती अवलंबली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला या निवडणुकीत 22 ते 25 च्या आसपास जागा जिंकण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. 

Web Title: Mumbai NCP focused on specific constituencies