बायोमेट्रिक हजेरीमुळे पगारास विलंब 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

भिवंडी - भिवंडी शहर महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने (थम्ब) हजेरीची नोंद घेऊन पगार देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. ती योग्य असली, तरी बायोमेट्रिक मशीनमध्ये अनेक त्रुटी असल्याने पालिकेचे अधिकारी-कर्मचारी कामावर असतानाही पटावर गैरहजर दिसत असल्याने त्यांची हजेरी लागत नाही. दीड महिन्यापासून शेकडो कर्मचाऱ्यांबाबत हा प्रकार होत असल्याने डिसेंबरचा पगार त्यांना मिळालेला नसल्यामुळे कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक संकटामुळे कामगार हवालदिल झाले असून त्याचा परिणाम पालिका प्रशासनाच्या कामकाजावर होत आहे.

भिवंडी - भिवंडी शहर महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने (थम्ब) हजेरीची नोंद घेऊन पगार देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. ती योग्य असली, तरी बायोमेट्रिक मशीनमध्ये अनेक त्रुटी असल्याने पालिकेचे अधिकारी-कर्मचारी कामावर असतानाही पटावर गैरहजर दिसत असल्याने त्यांची हजेरी लागत नाही. दीड महिन्यापासून शेकडो कर्मचाऱ्यांबाबत हा प्रकार होत असल्याने डिसेंबरचा पगार त्यांना मिळालेला नसल्यामुळे कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक संकटामुळे कामगार हवालदिल झाले असून त्याचा परिणाम पालिका प्रशासनाच्या कामकाजावर होत आहे. बायोमेट्रिक मशीन यंत्रणेतील त्रुटी तत्काळ दूर करून कामगारांचा पगार आठवड्यात करावा, अशी मागणी महापालिकेचे महापौर जावेद दळवी यांनी लेखी पत्राद्वारे आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे केली आहे. 

महापालिकेत सुमारे 4 हजारापेक्षा जास्त कामगार आणि कर्मचारी कार्यरत आहेत. पालिका प्रशासनाने सरकारी आदेशानुसार कामकाजात नियमितता यावी, यासाठी आयुक्तांच्या आदेशावरून बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंद करण्याची सुरुवात केली आहे; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कर्मचाऱ्यांच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे मशीनवर उमटत नसल्यामुळे कामावर असल्याबाबत हजेरीची नोंद संगणकावर होत नसल्याने कामगारांच्या पगारावर त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या युनियनचे अध्यक्ष व विविध युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात पालिका प्रशासनास लेखी कळविले असूनही प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने कामगारांची गैरसोय सुरू आहे, अशी माहिती महापौर दळवी यांनी दिली. कामगारांवर आर्थिक संकट आल्याने पालिकेच्या कामकाजावर आणि विकासकामांवर परिणाम होऊ लागला आहे. पालिका प्रशासनाने याची गंभीर नोंद घेऊन त्यांचे मासिक वेतन देऊन कामगारांचे हाल थांबवावेत, अशी सूचना महापौर जावेद दळवी यांनी आयुक्तांना लेखी पत्राद्वारे केली आहे. 

भिवंडी पालिकेतील कामगारांचा पगार येत्या दोन दिवसांत दिला जाईल. तसेच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरीबाबत अहवाल मागवून चौकशी केली जाईल. कोणावर अन्याय अथवा आकसाने कारवाई होणार नाही. 
- डॉ. योगेश म्हसे,  आयुक्त, भिवंडी महापालिका. 

Web Title: mumbai ne bhiwandi biometric attendance