मुंबई : गोराईत नवा उड्डाणपूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FLYOVER

मुंबई : गोराईत नवा उड्डाणपूल

मुंबई : गोराई रोड ते गोराई खाडीदरम्यान होणाऱ्या नव्या उड्डाणपुलासाठी ४.३ हेक्‍टरवरील खारफुटीचे क्षेत्र बाधित होणार आहे. ‘एमएमआरडी’मार्फत हा पूल बांधण्यात येत आहे. याबाबत पालिकेकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

बोरिवली पश्‍चिम येथील गोराई बेटावरील मोठा भाग पालिकेच्या हद्दीत येतो. या भागाचे नियोजन प्राधिकरण एमएमआरडीए आहे. आजही बोरिवलीहून या बेटावर बोटीतून जावे लागते. त्यामुळे गोराई रोड ते गोराई बेटादरम्यान खाडीवर ‘एमएमआरडीए’ चारपदरी उड्डाणपूल बांधणार आहे. या भागातील ४.३ हेक्‍टरचा भूखंड या पुलामुळे बाधित होणार आहे. हे मुंबईचे गावठाण असून मासेमारी करणारा कोळी समाज आणि इस्ट इंडीयन समाज येथील पारंपरिक रहिवाशी आहे. त्यामुळे या पुलाबाबत पालिकेने सूचना व हरकती मागवल्या आहेत. पालिकेच्या आर मध्य प्रभाग कार्यालयात २ डिसेंबरपर्यंत त्या लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

‘रिक्षाचा व्यवसाय बंद होईल’

गोराई उड्डाण पुलाला येथील संस्थेने विरोध केला आहे. या पुलामुळे मासेमारीसह परिसरातील शेतीवर परिणाम होणार आहे. तसेच, स्थानिक रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोराई गाव हे क्षेत्र नागरीकरणासाठी खुले होणार असल्याने दुसरे कॉंक्रीटचे जंगल बनेल, असा दावाही या संस्थेने केला आहे.

विकसकांचा लाभ

गोराईतील विकास विकसकांसाठी आहे. गोराई गावात प्राथमिक आरोग्य आणि शैक्षणिक संस्थांची गरज आहे. येथील मनोरी, कुळवेम, गोराईपासून उत्तनपर्यंतच्या संपूर्ण परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय, दर्जेदार महाविद्यालय प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. सरकारी यंत्रणा बांधकाम व्यावसायिकांसाठी अनुकूल निर्णय घेत आहेत. यासाठी पालिका पातळीवर प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या प्रकरणी वैयक्तिक सुनावणीची मागणी आम्ही मुंबई पालिकेकडे केल्याची माहिती ‘वॉचडॉग फाऊंडेशन’चे गॉडफ्री पिमेंटा यांनी दिली आहे.

loading image
go to top