दीनदयाळ उपाध्याय कोण आहेत?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

कॉंग्रेस प्रवक्‍त्यांचा राज्य सरकारला उपरोधिक सवाल

कॉंग्रेस प्रवक्‍त्यांचा राज्य सरकारला उपरोधिक सवाल
मुंबई - दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्य सरकार साडेचार कोटी रुपये खर्च करून त्यांच्या जीवनावरील पुस्तके खरेदी करणार आहे. ज्यांच्यावरील पुस्तकांवर सरकार इतका मोठा निधी खर्च करणार आहे, ते दीनदयाळ उपाध्याय कोण आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी, असा उपरोधिक टोला कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

सावंत म्हणाले, 'दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके खरेदी करण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रत्येकी साडेचार हजार रुपये किंमत असणारी 10 हजार पुस्तके राज्य सरकार खरेदी करणार आहे. भारतीय जनता पक्ष 2016-17 हे वर्ष दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहे. यानिमित्त पक्षाने स्वतःच्या निधीतून ही पुस्तके खरेदी केली असती, तर त्याला कोणाची हरकत असण्याचे कारण नव्हते; परंतु राज्य सरकार सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून ही पुस्तके का खरेदी करत आहे? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.''

'दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वातंत्र्यसंग्रामात काय योगदान दिले? ते स्वातंत्र्यासाठी कोणत्या तुरुंगात गेले होते? देशासाठी त्यांनी काय त्याग केला? देशातील मुस्लिम समाजाबद्दलची त्यांची वक्तव्ये, जातीवाद आणि चातुर्वर्णाबद्दल त्यांची मते काय होती? याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली, तर दीनदयाळ उपाध्याय यांची खरी ओळख आणि कार्य जनतेला कळेल,'' असे त्यांनी नमूद केले.

Web Title: mumbai new who is dindayal upadhyay