हार्बर मार्गावरील १५ भिकारी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

वडाळा - एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानक पुलावर घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वेने फेरीवाल्यांना हुसकावण्यास सुरुवात केली आहे. आता भिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वडाळा लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी (ता. १०) हार्बर मार्गावरील वडाळा रोड, किंग सर्कल आणि माहीम स्थानकांवरील आणि स्थानकालगतच्या परिसरात बसणाऱ्या १५ भिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

वडाळा लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या भिकाऱ्यांत दोन महिलांचा समावेश आहे. त्यांना रिमांडसह कुर्ल्यातील बेगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने नऊ भिकाऱ्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. सहा भिकाऱ्यांची रवानगी चेंबूरच्या बेगर होममध्ये करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या कारवाईमुळे रेल्वेस्थानकावर ठाण मांडणाऱ्या अनेक भिकाऱ्यांनी पलायन केले. कारवाईत जामदार के. डी. जाधव, टी. जे. वाजे, पी. ए. जगदाळे, एस. एस. गव्हाणे, आर. के. मोहिते, टी. एन. खांडेकर, आर. बी. निमसे आदी पोलिसांनी सहभाग घेतला.

Web Title: mumbai news 15 beggars on the harbor route