'राष्ट्रवादी'च्या माजी आमदाराला पावणेदोन कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नवी मुंबई - केंद्रातील एका महामंडळाचे अध्यक्षपद मुलाला मिळवून देतो, असे सांगून कामोठ्यातील भोंदूबाबाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विजय कांबळे यांना तब्बल एक कोटी 70 लाखाला गंडविले.

नवी मुंबई - केंद्रातील एका महामंडळाचे अध्यक्षपद मुलाला मिळवून देतो, असे सांगून कामोठ्यातील भोंदूबाबाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विजय कांबळे यांना तब्बल एक कोटी 70 लाखाला गंडविले.

याप्रकरणी कांबळे यांनी संबंधित भोंदूबाबाच्या विरोधात कामोठे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र न्यायालयाने याआधीच भोंदूबाबा उदयनाथ चव्हाण याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. कांबळे आणि उदयनाथ चव्हाण यांची एका मध्यस्थीच्या मदतीने ओळख झाली होती. या वेळी चव्हाण याने केंद्रातील बडे अधिकारी आणि मातब्बर नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचे भासवले; तसेच कांबळे यांना त्यांच्या मुलांची अनुसूचित जाती जमाती मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचे आश्‍वासन दिले. त्याबद्दल चव्हाण याने एक कोटी 70 लाख रुपये घेतले होते; मात्र मुलाची केंद्रातील महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती न झाल्याने कांबळे यांनी चव्हाण यांच्या मागे रक्कम परत करण्याचा तगादा लावला.

दोन वर्षांचा कालावधी उलटूनदेखील रक्कम परत न केल्याने अखेर कांबळे यांनी चव्हाण याच्याविरोधात फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी चव्हाण याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र कांबळे यांनी दिलेली रक्कम कोणत्याही इतर कामासाठी नसून सेवाभावी संस्थेला देणगीरूपात दिली आहे, अशी माहिती चव्हाण याने चौकशीदरम्यान दिली, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मडके यांनी दिली.

Web Title: mumbai news 1.75 crore cheating to ex. mla